कोकणचा शाश्वत विकास

कोकणचा विकास करायचा असेल, प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल, कोकणातून मुंबईकडे नोकरीसाठी जाणारा लोंढा थांबवायचा असेल तर पर्यटनातून आपण हे साध्य करू शकतो. पर्यटनातून स्थानिकांच्या घराघरात समृद्धी आणता येणे शक्य आहे. त्यासाठी निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे . आपली बलस्थाने कोणती याचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल . निर्मल, दरीच्या कुशीत असलेले समुद्र किनारे ,विस्तीर्ण समुद्रकिनारे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, हिरवाईने नटलेले डोंगर, त्यातून वाहणाऱ्या नद्या, धार्मिक स्थळे गडकिल्ले, चहूबाजूनी डोंगर त्याच्या मध्ये वसलेले गाव किंवा शहर सौंदर्यासक्त नजरेने बघीतल तर प्रत्येक ठीकाणी निसर्गाने भरभरून दिलय जे दृश्य आवडत नाही त्यात मात्र माणसाला सहभाग आहे असे आढळेल.
काही कोकणी लोक सातत्याने असे म्हणत असतात कि कोकण मागास आहे, कोकणचा विकास झालेला नाही. मी तर म्हणेल हे आमच व आमच्या पुढच्या पिढीसाठी चांगली गोष्ट आहे. आमच निसर्गसौंदर्य, डोंगर, दऱ्या , समुद्रकिनारे हे नैसर्गिक अवस्थेत आहेत आणि पुढील काळात याच गोष्टीवर पर्यटन बहणार आहे.
कोकणचा (रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग ) विकास करायचा असेल तर काही लांब पल्ल्याचे धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे . अर्थात हे शासनाचे काम आहे .रायगड जिल्हा व रत्नागिरीचा चिपळूण मधील लोटे परशुराम पर्यंतच उद्योग आणले पाहिजेत. लोटे पासून सावंतवाडी पर्यंत भागात फलोत्पादन , पर्यटन व फळ प्रक्रियावर चालणारे छोटे उद्योग असायला हवेत . पर्यटन हा मुख्य व्यवसाय असेल तर निसर्ग येथील मोठ्या ईमारती, पॉश हॉटेल असतील पण स्वच्छ परिसर , हवा नसेल, शांतता नसेल तर पर्यटक येणार नाहीत कारण यागोष्टी (चकाचक इमारत, हॉटेल) त्यांना शहरातही मिळत असतात .
पर्यटन व्यवसाय फुलविण्यासाठी कोकणवासीयांची काय जबाबदारी असेल याचा आपण विचार केला पाहिजे व सवयी, स्वभाव पर्यटन पूरक बनविला पाहिजे.
पर्यटनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘सुरक्षितता’ प्रत्येक कोकणवासीयाने आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांचे ‘रक्षक’ बनून काम केले पाहीजे. ही जबाबदारी पोलिसांची आहे आमची नाही असा संकुचित विचार करू नये आपल्याकडे आलेल्या पर्यटकाला (स्थानिक, विदेशी) प्रत्येक ठीकाणी आपण सुरक्षित आहोत असं वाटलं तर तो फिरण्याचा, खाण्याचा व राहण्याचा मनापासून आनंद घेईल व परत फिरण्यासाठी कोकणात याव असे त्याला वाटेल .
पर्यटकांशी आपण (स्थानिक) कसं बोलायला हव, कस वागायला हव हे शिक्षण फार महत्वाचं आहे. प्रत्येक पर्यटकाला आपण महत्व दिल पाहीजे त्यासाठी सौजन्याने वागायला पाहीजे, आपल्या परिवाराची (कोकणची महत्वाची ठिकाणे), तेथे जाणाऱ्या रस्त्यांची, तेथील जेवण, नाश्ता, राहण्याच्या सोयीची चांगली माहिती असली पाहीजे. जेणेकरून कोणीही पर्यटकाने पर्यटनाबद्दल काहीही विचारलं तर अचूक सांगता आलं पाहीजे. आपल्याला मराठी चांगलं बोलता आलं पाहीजे त्याच बरोबर हिंदी, इंग्रजीतही काही गोष्टी बोलता आल्या पाहिजेत.
पर्यटनातून विकास होताना स्थानिक लोकांनी सजग असल पाहीजे. हा व्यवसाय ८०% तरी स्थानिकांच्या हातात राहण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पहीली गोष्ट म्हणजे आपल्या जमिनी, मालमत्ता आपण विकता काम नयेत. त्याची महसूल तप्तरी नोंद व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत. ( Clear Title ). ज्यावेळी व्यवसायासाठी लोक जमिनी विचारतील त्यावेळी भाडेतत्वावर व भागिदारीत विकास करण्यासाठी दिल्या पाहिजेत. त्यासाठी शालेय विद्यार्थी, तरुणांनी पर्यटन क्षेत्र, हॉटेल क्षेत्र, उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र, कायदा क्षेत्र यातील अभ्यासक्रम पूर्ण करून त्या त्या परिसरातील सुशिक्षित तरुणांनी, जेष्टानी एकत्र येऊन संस्था उभारून लोकांना आवश्यक ती माहिती दिली पाहीजे. विविध राजकीय पक्षांचा गावपातळीवरील, तालुकापातळीवरील कार्यकर्त्यांनी लोकांना पर्यटक सजग करून पर्यटन विकासात स्थानिक लोक आघाडीवर राहतील असं पाहील पाहीजे.
पुढील भागात शासनाकडून आमच्या काय अपेक्षा आहेत ते पाहू.

पहिल्या भागात पर्यटन व्यवसाय कोकणाचा शास्वत विकास करू शकतो हे पाहीले स्थानिकांनी त्याला कसा प्रतिसाद दयायला पाहीजे तेही, पाहीले आज शासनाने कोकण विकासासाठी दूरदृष्टी ठेवून काय कराव अस मला वाटतय ते बघू.
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे चिपळूण ते सावंतवाडी हा भाग फलोत्पादन व पर्यटन म्हणून घोषित करावा मोठ्या उद्योगांना (प्रदुषणकारी व जादा जागा व्यापणारे, पाणी उपसणारे) या परिसरात परवानगी देऊ नये. पर्यटनाला पूरक छोटे उद्योग जसे फळ प्रक्रीया उद्योग, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेती पालन, यासारखे स्थानिक माणस करतील अशा व्यवसायांना प्रोत्साहन दयावे. राखीव जंगले ठेऊन (सह्याद्रीचा परिसर) एखाद अभयारण्य कराव. कोकणात गवत मोठ्या प्रमाणात उगवत व उन्हाळ्यात त्याला लागणाऱ्या आगीमुळे पर्यावरणाच व फळबागांच मोठं नुकसान होत गवतापासून कागद बनविण्याचा कारखाना सध्या जेथे MIDC आहे त्या भागात काढावेत.
फलोत्पादन हा पर्यटनाला पूरक असा व्यवसाय आहे. आंबा,काजू,रातांबी व इतर फळझाडांची लागवड आकर्षक रचनेत करण्यासाठी कृषी विभागाने स्थानिकांना मार्गदर्शन करावे त्यामुळे निसर्ग सौंदर्यात चांगलीच वाढ होईल. मिळणाऱ्या कृषी उत्पादनावर प्रक्रीया करून ज्यूस, कॅनिंग, चॉकलेटे केक असे पदार्थ बनविण्यासाठी स्थानिकांना मार्गदर्शन व वित्तीय पुरवठा केला पाहीजे. त्याकरिता स्थानिकांचे प्रशिक्षण वर्ग घेऊन मार्गदर्शन, प्रबोधन व चांगले पर्यटन असलेल्या ठिकाणी उदा. महाबळेश्वर, लोणावळा, केरळ येथे भेटी देऊन त्याचे महत्व पटवून दिले पाहीजे.
“परिसराचा विकास होताना स्थानिक माणसांचा विकास झाला तरच तो खरा शास्वत विकास”
पर्यटनसाठी चांगले रस्ते बनविले पाहिजेत त्यांची देखभाल वेळेवर केली पाहीजे, मार्गदर्शन फलक रस्त्यावर असले पाहिजेत. कोकणातील काही पर्यटन (गणपतीपुळे, कुणकेश्वर, तारकर्ली) स्थळांचा विकास करताना world heritage संकल्पनेत विकासाचे जे नियम आहेत ते पाळून विकास कामे केली पाहिजेत.
पर्यटन स्थळांची ‘अ’ ‘ब’ ‘क’ अशी विभागणी केलेली असते. प्रत्येक पर्यटन स्थळी प्रशस्त मोकळी जागा झाडे लावून सुशोभित केली पाहिजेत. पार्कींगसाठी चांगल्या दर्जाची व्यवस्था केली पाहीजे.
आज पर्यंत जास्त विकास न झालेले परंतु निसर्ग सौंदर्य अप्रतीम आहे असे स्थळ हेरून (उदा. राजापुरात गिरेश्वर मंदिर परिसर, अणसुरे) जी पर्यटन स्थळ भविष्यात मोठी विकसीत होऊ शकतात तेथे भूसंपादन करून (बाजारभावाने) मोकळी जागा MTDC निवास, पार्कींग, बाग यासाठी राखीव ठेवली पाहीजे.
कृषि पर्यटनाला योग्य असलेली जागा, शेतकरी याना हेरून त्यांना प्रशिक्षित करून कृषि आराखडा तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली पाहीजे.
बऱ्याच ठीकाणी फिरताना हे लक्ष्यात येते की पर्यटन स्थळी प्रत्येक वस्तूंचे दर हे MRP पेक्षा जास्त असतात. यावर शासनाने (Toll Free Number) व Online तक्रारी घेऊन संबंधितांवर त्वरित कार्यवाही करावयास हवी. सिंधुदुर्ग किल्ला, माचाळ जेथे डोक्यावरून वस्तू आणाव्या लागतात त्याठीकाणी पर्यटकांनी जादा किंमत देण्याची सहिष्णुता दाखविली पाहीजे.
ऐतिहासिक स्थळे आज जरी दुर्लक्षीत असली तरी ती सुस्थितीत ठेवण्यासाठी स्थानिकांचा सहभाग घेऊन ते काम शासनाने केले पाहीजे. पुढे त्याचा पर्यटनासाठी फायदा होणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील इमारत बांधकाम (रहीवासी, वाणीज्य, औद्योगिक) करताना चांगले वास्तुतज्ञ, इतिहास तज्ञ, पर्यटन तज्ञ याना एकत्र घेऊन एक समिती बनवून या परिसरातील वास्तूंची रचना करताना परिसराचे सुशोभीकरण होऊन, संस्कृती जपली जाईल असे ठरावीक नियम बनवून नगर रचना नियमावली पुस्तिकेत कोकण भागासाठी त्या नियमांचा अंतर्भाव केलेला असावा माझ्या मते केरळ राज्यात असे नियम आहेत.
पर्यटन करताना स्थानिकांना एक तोटा होताना मला आढळतो पर्यटन स्थळी जेवणाचे, राहण्याचे दर जास्त असतात. समजा रत्नागिरीला पर्यटनामुळे जेवण, रहाणे महाग असेल तर जिल्हा कार्यालयातील कामकाजासाठी सर्वसामान्य स्थानिक लोकांना जावे लागते, राहावे लागते आणि या दरवाढीचा फटका स्थानिकांना जे पर्यटक नसतात त्यांना बसतो. यावर उपाय म्हणून शाकाहारी राईस प्लेट व राहण्याचे कमी दर असतील अशा हॉटेलने टॅक्स मध्ये सूट देणे व इतर काही उपाय योजना करता येईल का याचा शासनस्तरावर विचार व्हायला पाहीजे.
कोकणात सहकार रुजला नाही, रुजत नाही तरी सुद्धा सहकार तत्वावर पर्यटन फुलवता येते का प्रयोग सहकार खात्याने करावयास हवा.
भौगोलिक दृष्ट्या कोकणाची रचना वेगळी आहे पण पर्यटनाला पूरक आहे त्यामुळे कोकणसाठी शासनाने विशेष प्रयत्न करून कोकणी जनतेला विकासाच्या दिशेने नेले पाहीजे.
शासनाकडून भरपूर अपेक्षा आहेत पण आपण स्थानिक काय करू शकतो याचा आढावा घेऊया पुढील भागात………..

कोकण पर्यटनासाठी नंदनवन आहे, पर्यटनातून कशा प्रकारे विकास होऊ शकतो हे आपण पाहीले, शासनाकडून काय अपेक्षा आहेत हे पाहील पण ज्याच्यासाठी हे करायचं आहे म्हणजे स्थानिकांची जबाबदारी काय ह्या विषयावर लिहल पाहीजे.
आपल्या कडे येणार पर्यटक हा आपला पाहुणा आहे. पाहुणा असला तरी तो आपल्याला पैसे देऊन जाणारा आहे. त्याला फिरताना सुरक्षित मोकळे वाटले पाहीजे त्यामुळे प्रत्येक कोकणवासीयांनी येणाऱ्या पर्यटकांचे रक्षक बनले पाहीजे. हि गोष्ट करताना कायदयाच्या चौकटीत केली पाहीजे त्यासाठी पोलीस, वकील यांची आपण मदत घेतली पाहीजे.
कोकणी माणूस मुंबईला काम करत असला कि व्यवस्थित राहतात, आदबशीर बोलतात पण गावात मात्र उर्मटासारखे वागतात. येणाऱ्या पर्यटकांशी आपण सौजन्याने, आदबशीर वागले पाहीजे. बाहेरून येणाऱ्यांना येथे परकेपणा जाणवणार नाही याची काळजी आपण घेतली पाहीजे.
स्वच्छतेचे (वैयक्तीक,सार्वजनिक ) महत्व अजून आपल्याला पटलेले नाही ते पटवून घ्यावे लागेल. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहीजे. रस्त्यावर वाटेल तेथे थुंकणे, कशालाही हात पुसणे, वेडे वाकडे हाव भाव करणे, दुसऱ्याला किळस आणणाऱ्या सवयी आपल्याला जाणीव पूर्वक दूर करायला पाहिजेत. पर्यटनाची पूर्वतयारी म्हणून सौजन्यपूर्व बोलणे, स्वच्छता राखणे या चळवळी म्हणून उभ्या केल्या पाहिजेत व आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे.
कोणत्याही अन्न पदार्थांचे, वस्तूचे दर आपण वाजवीच घेतले पाहिजेत. मालाचा शॉर्टेज असले तरी योग्य दरात वस्तू विकल्या पाहिजेत कोणाही पर्यटकाला आपण बनलो गेलो असे वाटता काम नये. रिक्षावाल्याने मीटर प्रमाणे पैसे घ्यावेत ते शक्य नसेल तर सगळ्यांचे दर हे वाजवी व एकच असले पाहिजे. पर्यटक अडचणीत असेल, त्याला मदतीची गरज असेल तर प्रत्येकाने मदत करण्यास उत्सुक असले पाहिजे,
अडचणीतील माणसांचा चुकूनही गैरफायदा घेता काम नये. सौजन्याने वागणे, स्वछता राखणे, अडचणीच्या वेळी मदत करणे ही आपली कोकणवासीयांची ओळख व्हायला हवी. कालांतराने हीच आमची संस्कृतीही व्हायला हवी.
तरुणांनी आपल्याकडे कीती जमीन आहे व ती कोठे आहे याचा आढावा घ्यायला पाहिजे. जमीन पर्यटन स्थळाच्या जवळ असेल, रस्त्यालगत असेल तर पर्यटक पूरक न्याहरी व्यवस्था, हॉटेल व इतर दुकान टाकण्याची तयारी करायला हवी. आपली जमीन व इतरांचा पैसे असा भागीदारीत काय व्यवसाय करता येईल याची चाचपणी करायला हवी. जमीन कायमची मात्र विकता काम नये. अगदी आवश्यक असेल तर अर्धी जमीन विकून त्यापैशातू अर्धी जमिनीत व्यवसाय करायला हवा.

      उद्योगी होण्यासाठी आपण आपल्याला आवडेल त्या शाखेत शिक्षण घेतले पाहिजे. पुस्तके वाचून इतरांचे अनुभव एकूण बऱ्याच गोष्टी शिकता येतात. पर्यटन,फलोत्पादन याविषयातून आपल्याला अर्थाजन करायचा असा ध्यास घेतला पाहिजे. ज्यांची जागा पर्यटन स्थळापासून लांब असेल त्यांनी फलोत्पादन, कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. उत्पादित माल हा जवळच विकला जाईल व पर्यटनाचा आपल्याला लाभ घेता येऊन रोजगाराचे साधन आपणच निर्माण करू शकू. पर्यटन ही आपली चळवळ असली पाहिजे, त्याचा कायम ध्यास घेतला पाहिजे.

      विकास करायचा तर स्थानिक आणि शासन यांचा एकत्रित सहभाग असणे महत्वाचे. पर्यटनाबाबत आपण खंबीर राजकीय भूमिका घेतली पाहिजे. विविध होणाऱ्या निवडणुकामध्ये सर्वच राजकीय पक्षांना पर्यटन व फलोत्पादन याला निवडणूक जाहीरनाम्यात काय स्थान आहे, त्याबद्दलची उमेद्वारांची मते काय आहेत व पर्यटन विकासासाठी राजकीय पक्ष काय धोरण अवलंबणार आहेत, आम्हा स्थानिकांचा त्यात कसा सहभाग असणार आहे याबाबत सविस्तर चर्चा केली पाहिजे व जो पक्ष उमेद्वार पर्यटन, फलोत्पादनात स्थानिकांना घेऊन काम करेल त्याला मतदान केले पाहिजे त्यासाठी प्रथम आम्हाला प्रत्येक गावात काय हवय, काय करायचं ही शोधलं पाहिजे व तशी भूमिका घेण्यास राजकीय पक्षांना भाग पाडलं पाहिजे.

     पर्यटन व फलोत्पादनातून कोकणाचा विकास करण्यासाठी निसर्गाने दिल खोलके दिलेलं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला कोकणचा शास्वत व सर्वांगिण विकास हा याच मार्गाने होईल अस माझं ठाम मत आहे.
धन्यवाद

जगदीश बंडोपंत पवार-ठोसर
माय राजापूर