दक्षिण विजयी मराठी बाणा.

श्री बालाजी डोसा सेंटर हे नाव वाचून व त्याच्या मालकांना बघून हे साऊथ इंडिअन पैकी हॉटेल आहे असे वाटेल. पण हे सेंटर आहे एका मराठी कोकणी माणसाचे.
आज कामानिमित्त मी आणि हृषिकेश मंदरुळ ता. राजापूर (येथूनच पुढे चुनाकोळवंन बाहुबली धबधबा आहे) येथे गेलो होतो, काम आटोपल्यावर आम्ही मंदरुळ गावातून मुंबई गोवा हायवेवर आलो व समोर श्री बालाजी डोसा सेंटर ही हातगाडीवर असलेले हॉटेल दिसले. तेथे जाऊन डोसा खाण्याची इच्छा झाली म्हणून तेथे गेलो व डोसाची ऑर्डर दिली व खुर्चीवर बसलो. पँटीस,वडापाव, कटलेट देणारे गृहस्थ दाक्षिणात्य वाटत होते, डोसा करणाराही मुलगा बाहेरचा वाटत होता. संध्याकाळची वेळ असल्याने ग्राहक भरपूर होते, काही पार्सल घेऊन जात होते, पार्सल बांधण्याची पद्धतही शहरी पद्धतीची वाटली. आम्हाला डोसा आणून दिला त्यावेळी मी त्यांचे नाव विचारले ते काम करत गडबडीत दहीबावकर म्हणाले.


आम्ही गरम डोसा खाल्ला ,डोसा रुचकर होता ,नंतर चहा सांगितला तर करून लगेच देतो म्हणाले व चहा करायला शेड मध्ये आले त्यावेळी मी त्यांना विचारले दहीबावकर तुम्ही मराठी आहात ना? ते म्हणाले मी दहीबाव,देवगड येथील दहीबावकर आहे, माझी बायको राजापूर प्रिंदावन गावची राणे. मी लहानाचा मोठा मुंबईत धारावीत झालो, त्यात मी अमराठी ग्रुपमध्ये वाढलो, सुरवातीला वीस वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले व त्यानंतर हॉटेलमध्ये ,दहा वर्षांपूर्वी कोकणात ओणी येथे आलो व केटरिंग व्यवसाय मी व पत्नीने सुरू केला. गेली तीन वर्षे साऊथ इंडिअन डिश गाडीवर विकण्यास सुरवात केली. हायवेच्या रुंदीकरणात ओणी येथील जागा गेली आत्ता मंदरुळ येथे सुरू केलंय. मी त्यांना येथे गिराईक येते का? त्यावर म्हणाले अलीकडे सुरू केल्याने थोडं कमी आहे पण आत्ता वाढतंय. मी त्यांना डोसा करणारा कोण असं विचारलं तर ते म्हणाले माझा मुलगा समीर, आम्ही सर्व घरातील माणसेच काम करतो. 500-600 माणसांचे जेवण मी व माझी बायको बनवतो(केटरिंगची ऑर्डर असेल त्यावेळी) .मराठी असून आपण हा धंदा व त्यात हे दाक्षिणात्य पदार्थ कसे काय ठेवलात तर म्हणाले मी मुंबईला असताना हे शिकून घेतलंय व विविध प्रकारचे ताजे, रुचकर पदार्थ दिले तर गिरायकाची काही कमी नाही. मी म्हणालो मराठी तरुणांनी तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे ,ते म्हणाले आपल्याला जे काम करणे जमते ते आवडीने करून दुसऱ्याची गरज पूर्ण केली की धंदा सुरू होतो.आपण जर लोकांना सेवा देत असू तर कामाची लाज कसली, ते आपल्याला त्याचा मोबदला देतात की. सुहास दहीबावकर खूप कामात व गडबडीत होते त्यामुळे मीही नंतर भेटून सविस्तर बोलूया असे म्हणालो तर येताना सकाळी या माझ्याकडे मेदूवडा चटणी खाऊन बघा ,मग काय त्या गप्पा मारुया, हा माणूस दुसऱ्याला खाऊ घालायला बसलाय म्हणून तर येथे गर्दी दिसतेय. मी त्यांना नमस्कार केला व राजापूरच्या दिशेने निघालो.
कोकणातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत हे जाणवले गरज आहे ती आपली आवड ओळखून कौशल्य संपादन करणे व झोकून काम करण्याचे.
श्री. जगदीश बंडोपंत पवार-ठोसर.
माय राजापूर.