“शाश्वत पर्यटन परिषद २०२० “

रत्नागिरी येथे बुधवार दि. २९/०१/२०२० ला आयोजित केलेला शाश्वत पर्यटन परिषद 2020 चा आजचा कार्यक्रम फार छान झाला, कार्यक्रम आयोजक सर्व श्री.राजुभाई भाटलेकर, मकरंद केसरकर, सुहास ठाकुरदेसाई, सुधीर रिजबुड, धनंजय मराठे या सर्वांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विषयक सध्यस्थिती त्यांची व्याप्ती व झोकून देऊन पर्यटन विषयात काम करणाऱ्या नामवंत व यशस्वी लोकांशी आमची(माय राजापूर सदस्य) झालेली भेट ही आम्हाला राजापूर तालुक्यात पर्यटन विषयक काम करताना पथदर्शक मार्गदर्शक ठरणार आहे.

श्री. केसरकर यांचे अष्टपैलू सूत्रसंचालन हे अनुभव सप्पन माहिती व सद्यस्थितीचा आढावा घेणारे व प्रेरक होते.त्याला श्री. सुधीरजी रिजबुड यांची सौम्य आवाजातील माहितीप्रद साथ.

श्री/सौ. कुलकर्णी, श्री/सौ., करकरे यांनी कृषी पर्यटन म्हणजे काय? ते कोकणात करताना काय केले पाहिजे हे अतिशय सोप्या भाषेत विशद केले.

कोकणी पद्धतीचे सारवलेले अंगण, कौलारू चौपाकी स्थानिक साहित्याचा वापर करून बांधलेले घर, त्याला मातीची जमीन (Mud flooring), साधी परंतु सुबक सजावट व अत्याधुनिक टॉयलेट अशी निवास व्यवस्था पर्यटकांना जास्त आकर्षित करते असे सांगितले.

कोकणात कृषी पर्यटनात पदार्पण करून यशस्वी व्हायचे असेल तर

१)ध्येय/उद्दिष्ट

२)नियोजन

३)चिकाटी

४)सातत्य

५) चतुर मार्केटिंग

वरील पंचसूत्री अवलंबणे आवश्यक आहे असे कुलकर्णी दांपत्यानी सांगितले.

करकरे दांम्पत्याने आपल्याला पाहुणचार,आदरातिथ्य करायची आवड असेल तर सुरवातीला आपल्याला जमेल तेवढया आवाक्यात कृषी पर्यटन चालू करा व त्यानंतर संधीच्या शोधात राहून,कल्पकता वापरून पर्यटकांची मागणी व गरज लक्षात घेऊन कृषी पर्यटनाच्या मूल्यांना बाधा न आणता नवीन उपक्रम हाती घेऊन त्याचे विस्तारीकरण केले पाहिजेत असे सांगितले.

अतिशय ग्रामीण भागात त्यांनी(कुलकर्णी, करकरे) यशस्वी केलेल्या कृषी पर्यटनातून त्यांना आलेल्या अनुभवातून व्यक्त केलेले त्यांचे मनोगत मनाला खूप भावले.

श्री. नंदू तांबे यांचे जंगल पर्यटन व त्यातून पर्यावरण रक्षण करण्यासाठी उचललेली जबाबदारी उच्य पातळीची नैसर्गिक जगण्याची उर्मी जागृत करणारी होती. मला तर ते “आध्यात्मिक” पर्यटन वाटले.

विनोबा भावे आध्यात्मावर बोलताना म्हणतात

“आध्यात्म म्हणजे पूजा अर्चा, स्त्रोत्रपठण आणि तीर्थ यात्रा नाही तर समत्व भावनेचा विचार स्वतःच्या मनात रुजवण म्हणजे आध्यात्म”

समत्व भावना म्हणजे:-हे जग सर्वांसाठी आहे, प्रत्येकाला इथं सारख्याच हक्काने जगाता आलं पाहिजे, माझ्या प्रमाणे इतरांनाही (प्राणी,पक्षी व जीवजीवाणू) भावभावना आहेत त्यांचा विचार करूनच आपण वागलं पाहिजे. याप्रमाणे पृथ्वीवरील प्रत्येक चराचराची काळजी घेणे व प्राणी, पक्षी यांच्या अधिवासात मानावाने ढवळाढवळ न करता निसर्गाचा आनंद घेता येणे हे शाश्वत पर्यटन आहे. त्यांचे म्हणने पटणारे आहे व दिग्मूढ होऊन विचार करायला लावणारे आहे.

समृद्ध कोकणचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय यादवराव यांची अनुपस्थिती कार्यक्रमातला जाणवली त्यांच्या अनुपस्थितीत श्री. किशोरभाई धारिया यांनी केलेले मार्गदर्शन, पाण्याचे महत्व उद्बोधक होते.

ह्या शाश्वत परिषदेत पर्यटन व्यवसायिक व पर्यटन आवड,जाण असणारे लोक होते,शाश्वत पर्यटन ही ठराविक पर्यटन व्यवसायिक व पर्यटनाची आवड असणाऱ्या लोकांपूर्ती मर्यादित चळवळ न राहता ती रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकांची पर्यटन चळवळ व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आमची “माय राजापूर” संस्था पर्यटन जागृती साठी प्रचार, प्रसार, प्रबोधन हे काम करत असते. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन संस्कृती निर्माण करण्यासाठी तालुका, गाव पातळीवर काम करणारे पर्यटन कार्यकर्ते किंवा पर्यटन मित्र तयार करणे आवश्यक आहे. या कामात मान, सन्मान, पैसा नसल्याने पर्यटन विषयक आस्था,आवड असलेली माणसेच यात सहभागी होतात, त्यांची संख्या फार कमी असते असा माय राजापूर संस्थेचा अनुभव आहे. पर्यटनातून शाश्वत विकास करताना सर्व सामान्य माणसाचे जिवनमान उंचावण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पर्यटन हे क्षेत्र कसे फायदेशीर आहे हे पटवून देणे व त्यांना पर्यटन विषयक सेवा, सुविधा निर्माण करण्यासाठी कार्यप्रवण बनविण्यासाठी पुढील काळात आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे .

आजचा कार्यक्रम छान झाला, सर्व आयोजकांचे आभार.

श्री. जगदीश पवार-ठोसर

माय राजापूर.

टीप-अशी परिषद पुन्हा भरवताना 250 ते 300 प्रवेश मूल्य घ्यावे व मान्यवर व संस्था यांचा सत्कार करताना प्रत्येक तालुक्यातील एक किंवा दोन जणांचा सत्कार आगाहू जाहीर करून करावा.वरील मत हे माझे वैयक्तीक आहे त्यावर विचार व्हावा ही विनंती.