शेतीची गाथा भाग 1

नमस्कार,
कोबी, फरसबी, टोमॅटो, पापडी ह्या भाज्या कोकणात होतात, करत असतील हौस म्हणून पण आम्ही भाजी विकत घेतो ती घाटावरची असते. असेचआपलेही मत असेल ना? आपल्या राजापूर तालुक्यात या भाज्या होतात व त्या घरोघरी विकून पैसेही मिळतात हे वास्तव बघण्यासाठी आम्ही “माय राजापूर”कर वाल्ये गावात गेलो होतो.
मुंबई गोवा हायवेवर राजापूर पासून खारेपाटण कडे साधारण १३कि. मी. वर वाल्ये फाटा लागतो तेथून ५ कि. मी.वर वाल्ये गाव. खारेपाटण वाघोटन खाडी शेजारी असलेले निसर्गसुंदर गाव म्हणजे वाल्ये. खाडीच्या पलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोर्ले गाव आहे. खाडी शेजारी असलेली मळे जमिनीत पूर्वी स्थानिक माणसे पावसाळ्यात भात शेती (खरीप) व हिवाळ्यात दवावर कुळीथ शेती (रब्बी) करत ,त्यानंतर प्रत्येकजन नशीब आजमावयाला मुंबईत जायला लागला व गावात म्हातारी माणसे राहायला लागली.१५-२० वर्षे शेती कोणचं करत नव्हते. त्या गावचे माझे भाऊजी श्री. सुधीर तावडे हे कृषी विभागात आहेत त्यानी स्थानिक शेतकऱ्यांकडून लीजवर म्हणजे गावठी भाषेत खंडाने शेती करण्यासाठी मागितली व गावकऱ्यांनी ती दिली, १५-२० वर्षे पड शेती असल्याने झाडे झुडपे इतकी वाढली की साफसफाई करायलाच भरपूर खर्च आला व तेथे शेती सुरू केली.
आज जी शेती दिसतेय किंवा त्यातून जे उत्पन्न मिळतेय त्याचा नायक मात्र वेगळाच आहे. आम्ही त्याला राजू म्हणतो त्याचे पूर्ण नाव आहे श्री. राजेंद्र एकनाथ गुरव, त्याची आई सौ. वैशाली व त्याची पत्नी सौ. रिया. पूर्ण दिवस शेतावर मेहनत करून आज ते या मातीतून सोने पिकवतायत. त्यांना कृषी विषयक तांत्रिक माहिती देतात श्री.सचिन अभिमान मारकड व श्री. तावडे. माझी बहिण सौ. स्नेहा तावडे ही स्वतः शेतात राबते व इतरांना प्रोत्साहान देते.
राजू गुरव याचे शिक्षण झाल्यावर त्याने व्यवसाय म्हणून रिक्षा धंदा सुरू केला त्या दंध्यात कामापेक्षा रिकाम्या गप्पाच जास्त व्हायच्या, मग त्याने गाडी दुरुस्ती शिकून कोंडये येथे श्री. तावडे यांच्या घराजवळ मोटार सायकल व रिक्षा रिपेरिंग व सर्व्हिसिंग सुरू केले, सुरवातीला त्यात चांगले पैसे मिळायचे पण नंतर उधारी मुळे अडचणीत आला.
दिवसभर मेहनत करून म्हणावे तसे पैसे मिळत नसल्याने तो व्यवसायात समाधानी न्हवता; मग तावडेंशी चर्चा करून शेती करायचे ठरविले व आपल्याच गावात शेती सुरू केली.
अडीज एकर क्षेत्रात सुरवातीला ऊस केला उसाचे उत्पादन चांगले झाले पण गगनबावडा येथे साखर कारखाना असल्याने व स्वतः सभासद नसल्याने सर्वात शेवटी ऊस गेला व तोडणी कामगारांना तोडणीचे जास्त पैसे द्यावे लागले असे दुसऱ्यावर विसंबून शेती करणे धोकादायक ठरू शकते म्हणून दोन वर्षांनंतर पावसाळ्यात भात शेती, हिवाळ्यात कुळीथ त्याबरोबर कलींगड,कोबी, फरसबी, वाल, वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, पापडी,झेंडू एवढेच काय कांदे व बटाटे ही केलेत नुसते हौस म्हणून नव्हे तर ते विकून त्यातून चांगले पैसे मिळवतो व चांगले समाधान. होणारी भाजी स्थानिक माणसे शेतात येऊन विकत घेतात व जास्तीची भाजी राजू शेजवली,खारेपाटण येथे संध्याकाळी एक दोन तासात विकून येतो. यावर्षी कलींगडला जागेवरच गिर्हाईक मिळाले. रिक्षा धंदा, गॅरेज येथे कस्ट करून म्हणावे तसे पैसे मिळत नव्हते पण शेतीत जेवढे जास्त कस्ट करू तेवढे जास्त पैसे मिळतात व समाधान मिळते ते वेगळेच.जमिनीत जेवढे श्रम करू तेवढा मोबदला जमीन देते, त्यामुळेच शेती करणे मला आवडते, त्याला माझी आई, बायकोही साथ देते. शेती ही एकट्याने करण्याची गोष्ट नाही तर सर्व कुटुंबाने एकत्र करण्याची गोष्ट आहे.एकत्र काम केल्याने कौटुंबिक जिव्हाळाही वाढतो.


आम्ही त्याला तुझी भाजी लोके विकत घेतात ? त्यावर तो ज्यांना माहीत आहे ते माझी वाट बघत असतात मी त्यांना आगाहू कळविलेले असते मी कधी येणार व कोणती भाजी घेऊन येणार.त्यामुळे माझी भाजी लगेच संपते. त्यावर त्याने एक गम्मत सांगितली सुरवातीला जंगल साफ करून ऊस लावला त्यावेळी टाकळा खूप उगवला एवढा टाकला काढून टाकायला जादा माणसे लावणे गरजेचे होते, सुरवातीला त्याने टाकळ्याच्या भाजीच्या पाच पेंढ्या करून इतर भाजी बरोबर कोंडये येथे विकायला नेल्या,सुरवातीलाच त्या पाच पेंढ्या संपल्या व नंतर इतर भाजी संपली, त्यावर्षी त्याने ₹३०००/-ची टाकळा भाजी विकली. आत्ता पूर्वीसारखे राहिले नाही ,माणसे पारस बागेत भाजी पाला करत नाहीत, लोकांकडे पैसे आहेत ते प्रत्येक गोष्ट विकत घेतात. भाजील्याला भरपूर बाजारपेठ आहे, पण त्यात विविधता हवी. माझी झेंडू फुले मी पालखी उत्सवात विकता येतील या हिशोबाने लावली आहेत. त्यावेळेस झेंडूला मागणीही असते व दरही असतो. बाजारपेठेत काय विकते याचा अंदाज घेऊन शेती करणारा हा राजू मला मॅनेजमेंट शिक्षण घेतल्यापेक्षा जास्त हुशार वाटला.
राजूला शेतीची विविध बियाणी, रोपे आणून देणे, पिकाची माहिती व काळजी कशी घ्यायची याची माहिती देणारे श्री. सचिन मारकड व श्री. तावडे तेवढ्यात शेतावर आले. मारकड बारामतीचे शेती करनारे, शेतात काम करणे हे त्यांचे आवडीचे काम, ते प्रत्येक गोष्टीची माहिती राजूला देतात, प्रसंगी करून दाखवतात, वेगवेगळी(कांदा, कोबी, बटाटा)बियाणी आणून देतात, त्यांच्यावर कोणते रोग कधी येतात त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे समजावून सांगतात व वेळ मिळेल त्यावेळी शेतीला भेट देतात.
शेतावर वावरणारे हे कृषी अधिकारी मला खूपच भावले. गेली सात वर्षे राजापूरात आहेत. त्यांना मी बारामतीतील शेतकरी व कोकणातील शेतकरी यात काय फरक आढळला असे विचारले तर बारामतीच्या शेतकऱ्यांना शेतीचे महत्व कळले, शेतीतून चांगले पैसे मिळतात हे त्यांना कष्टातूंन कळले ,त्यामुळे शेती करणे हे त्यांनी आवडीने स्वीकारले, कोकणी शेतकऱ्यांना अजून शेतीचे महत्व म्हणावे तसे कळले नाही, इथला शेतकरी भात, आंबा, काजू या पारंपरिक शेतीतून बाहेर येत नाही व बाजारात काय विकले जाईल याचा अंदाज घेऊन शेती करत नाही, त्यासाठी आम्ही त्यांना शेतीतून चांगला फायदा होतो हे समजून सांगितले पाहिजे, त्यांना नवीन शेती करायला धीर दिला पाहिजे मग राजू सारखे शेतकरी कोकणात तयार होतील. पण कोकणी शेतकऱ्यांनी शेती सोडून, जमीन विकू नये, शेतीला भविष्य आहे, आत्ताच्या पिढीला शेती फायदेशीर करता आली नाही तरी पुढील पिढी शेती करून पैसे मिळवू शकते. कुठल्याही औधोगिक उत्पादनापेक्षा भविष्यात शेतीमालाला प्रचंड मागणी आहे. शेती ही पैसे मिळवण्यासाठी व्यवसायिक मानसिकता ठेऊन करायची समज का एकदा लोकांना आली तर शेती फायदेशीर होईल .
आज दि.३/०३/२० रोजी आमच्या “माय राजापूर” टीमच्या वतीने सर्व श्री. चंद्रशेखर सिनकर, परेश भोसले,हृषिकेश कोळेकर व मी भेट दिली.सभोवार झाडांनी वेढलेले डोंगर, बाजूने वाहणारी वाघोटनची खाडी, संध्याकाळची तिरपी पडणारी सोनेरी किरणे,थंड मंद वाहणारा वारा,राजू,त्याची आई वैशाली, पत्नी रिया यांच्या काबाडकष्टातून सभोवारचे हिरवेगार शिवार पाहून आम्हाला स्वर्गीय आनंद मिळाला.
श्री. जगदीश बंडोपंत पवार-ठोसर.
माय राजापूर.