“सृजन यात्रा”

    सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान कराड ही सामाजिक संस्था प्रशासकीय अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख यांच्या प्रेरणेतून निर्माण झाली व विविध सामाजिक विषयावर काम करते. समाजात विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना भेट देऊन समाजभान जपणारी तरुणाई पिढी निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी “सृजन यात्रा” ही सहल(यात्रा) आयोजित करतात यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील निवडक सामाजिक संस्थांना भेटी दिल्या ,आज मंगळवार दि.१२/११/२०१९ रोजी ही मंडळी “माय राजापूर” संस्थेचे काम जाणून घेण्यासाठी दुपारी ११.३० वाजता राजापूरात आली. एकूण पस्तीस माणसे होती त्यात बहुतेक तरुणाई होती.

सुरवातीला सौ. बागल मॅडम व श्री. सागर बकरे यांनी सर्वांशी ओळख करून दिली.

त्यानंतर आमचे सदस्य श्री. हृषीकेश कोळेकर यांनी घरी बनविलेल्या(घरगुती) चिंचेच्या सरबताने स्वागत केले.त्यानंतर माय राजापूरचे उपाध्यक्ष श्री. संजय मांडवकर यांनी यात्रा परिवाराच्या श्री. पाटील यांचे प्रातिनिधिक स्वागत पुसपगुष्छ देऊन केले तसेच राजापूरचा शिवकालीन इतिहास “शिवराजस्पर्श” या ग्रंथाची प्रत व “माझं राजापूर”पर्यटन पुस्तिकेची प्रत भेट म्हणून देण्यात आली.

  सेवयोग संस्थेच्या वतीने श्री. सागर बकरे व इतर सदस्य यांनी सृजन यात्रा मेळघाट, खानदेश, विदर्भ, प. महाराष्ट्र येथील सामाजिक संस्थाना भेट देऊन झालेल्या आहेत. सहलींचा उद्देश हा सर्व परिसराची भौगोलिक, सामाजिक रचना जाणून घेऊन, त्याठिकाणी होणाऱ्या समाजऊपयोगी काम जाणून घेऊन नवीन पिढीला त्याची आवड व दिशा दर्शन करण्यासाठी आयोजित केली जाते. या सहलीमध्ये कोणतीही मौजमजा करण्यासाठी प्रसिद्ध स्थळांना ,धार्मिक   स्थळांना भेट देण्यात येत नाही, प्रसिद्धी न मिळालेली ठिकाणे व सामाजिक संस्था यांना भेटी दिल्या जातात.चर्चा ही सामाजिक, देशभक्ती यावरच केली जाते, गाणीही त्याच विषयावर ऐकली व गायली जातात . हौस, मौज करण्यासाठी ही यात्रा नसते तर आपल्या भारतातील सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी आपण सर्व भारतीय एक आहोत म्हणून हे “जोडो भारत अभियान” आहे असे यावेळी सांगण्यात आले. यावेळच्या यात्रेत कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला या जिल्ह्यातील सदस्य होते. कोणतंही सामाजिक काम करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून, समाजाची गरज ओळखून आपल्याला आवडेल अश्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तरुणाईला व इतरांना मिळावी यासाठी ही यात्रा सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान करत असते.

   माय राजापूर संस्थेच्या वतीने श्री. जगदीश पवार यांनी “माय राजापूर”संस्थेचे नाव व “माझं राजापूर”ही पर्यटन पुस्तिकेच नाव हे संकुचित दृष्टीने ठेवलेले नसून इथल्या नैसर्गिक सौन्दर्याने नटलेला प्रदेश, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी याचे महत्त्व, याची महती स्थानिकांना सर्वप्रथम कळली पाहिजे, आपल्या परिसराचा अभिमान वाटला पाहिजे व हे निसर्ग सौन्दर्य ,अथांग समुद्रकिनारे, धबधबे, सहयाद्री व येथील जनजीवन व जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटकांनी येण्यासाठी व त्यांना सोई सुविधा , सुरक्षा देण्यासाठी स्थानिकांना पुढाकार घेऊन शेती, फलोत्पादन व पर्यटन या माध्यमातून आपले सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक जीवनमान स्वकष्टाने व प्रामाणिकपणे उंचावण्यासाठी कार्यप्रवण बनावे या उद्देशाने “माय राजापूर” हे नाव देण्यात आले व त्यासाठी  ही संस्था काम करते. कोकणातील माणसाने कोकणात राहून कोकणाला मिळालेल्या निसर्ग सौंदर्य,भौगोलिक ठेवण यात संधी शोधून आपला रोजगार आपणच शोधला पाहिजे ही दृष्टी देण्यासाठी आमची संस्था काम करते. संत तुकाराम, एकनाथ, नामदेव या संतांनी त्या काळातील प्राप्त परिस्थितीत आध्यत्मिक कसे जगावे, आनंदी कसे जगावे,आपल्या देव देवदेवतांसोबत आपल्या परिसरावर प्रेम करत आपली उन्नती कशी करावी याची शिकवण प्रचार, प्रसार, प्रबोधन करून दिली .आत्ता काळ बदललाय त्यामुळे आत्ताच्या काळात आपल्या क्षमता, आपली बलस्थाने ओळखून आपली शाश्वत प्रगती करण्यासाठी “माय राजापूर” प्रचार,प्रसार, प्रबोधनाचे काम करते त्यामुळे आमचे काम भौतिक स्वरूपात दाखविने कठीण जाते. समाजातील लोकांनी हे आचरणात आणले तर पाच वर्षात सकारात्मक बदल ह्या परिसरात दिसेल याची आम्हाला खात्री वाटते.

        यानंतर श्री. सिनकर सरांनी “माय” म्हणजे माझं व माय म्हणजे माय भूमी यार्थी माय असे विशद केले व  प्रोजेक्टरवर प्रेझेन्टेशन द्वारे  माय राजापूरने केलेल्या कामाचा खालील प्रमाणे धावता आढावा घेतला.

१)२ मे २०१५ मध्ये राजापूर पर्यटन विषयक पुस्तिका प्रसिद्द केली.

२)२ मे २०१५ ला “माय राजापूर”नावाने राजापूरातील पर्यटन स्थळांचे छायाचित्र प्रदर्शन भरविले.त्यानंतर २०१६ ला परत राजापूर व जानशी येथे व चिपळूण पर्यटन मोहत्वात छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले.(यात मा. प्रांत श्री. खांडेकर साहेब यांचे सहकार्य लाभले)

३)ऑक्टोबर २०१५ व २०१६ ला प्रगत राजापूर व माय राजापूर संस्थेचे एकत्र येऊन नवरात्रीला एका दिवसात नऊ देवीचे दर्शन “नवदुर्गा”उत्सव करण्यासाठी ट्रिपचे आयोजन केले.यात श्री. सुधीरजी रिजबुड,गणेश रानडे यांचेही सहकार्य लाभले.

४)”सवत कडा” चुनाकोळवन या पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करून २४ मे २०१७ ला  तो सरपंच ग्रा. प. चुनाकोळवन यांना प्रांत कार्यालयात समारंभ पूर्वक देऊन, समजून सांगून तो ग्रामसभेत मांडण्यास सांगितला व वरील आराखडा पालकमंत्री मा. ना. श्री.वायकर साहेब व जिल्हा नियोजनाला देण्यात आला.

५) जानेवारी २०१८ ला हायस्कूल मर्यादित आपल्या गावातील,गावाजवळील पर्यटन स्थळे यावर निबंध स्पर्धा आयोजित केली.

६)इ. स.१६४९ ला व्यापारासाठी राजापूरला इंग्रज वखार बांधली होती ती धोकादायक झाल्याने २००५ ला पडण्यात आली, १६६० ला पन्हाळगड वेढ्याच्या वेळी सिद्धी जोहरला इंग्रजांनी लांब पल्यावर मारा करणाऱ्या तोफा पुरविल्या म्हणून छ. शिवरायांनी १६६१ मध्ये येऊन वखार लुटली होती;असे महाराजांच्या  पराक्रमाचे प्रतीक असलेल्या वखारीच्या पुनर्निर्माण व्हावे म्हणून आराखडा तयार करून तो राजापूर नगराध्यक्ष, मा. पालकमंत्री, व त्यांच्या शिफारशीने मा. मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आला आहे.

७)ज्या गावात पर्यटन होऊ शकते अश्या निवडक गावांच्या सरपंचांना भेटून स्थानिक पातळीवर पर्यटकांची कोणती सोय करता येईल व ग्रामपंचायत मार्फत काय करू शकतो याचे पत्र देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

८)५ मे २०१८ रोजी मा. श्री. संजयजी यादवराव यांच्या हस्ते myrajapur.in ह्या पर्यटन विषयक वेबसाईटचे अनावरण केले.

९) ९ डिसेंबर २०१८ रोजी लहान मुलांसाठी hour of code कार्यक्रम आयोजित केला.

१०) १० मे २०१९ रोजी शेतकरी मेळावा आयोजन.

बाकी अनाथ, अपंग मुलांना शैक्षणिक व कौटुंबिक(किराणा माल) मदत करणे, मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम करणे, प्रगतशील शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांना प्रसिद्धी देणे, नवीन पर्यटन स्थळे शोधून त्यांना प्रसिध्द देणे व नवीन कार्यकर्ते जोडणे ही कामे आपल्या कार्यव्यसत्ततेतून  वेळ काढून करत असतो अशी माहिती दिली.

    सेवायोग प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण महिला बचत गटाने बनविलेली आकर्षक पिशवी व सृजन यात्रा स्मरणिका आठवण म्हणून भेट दिली.

   यावेळी सेवायोग प्रतिष्ठान यांनी वाजवी दरात जेवण उपलब्ध करून द्यायची विनंती केली होती ,त्याला आमच्या जेष्ठ सदस्या श्रीम. प्रणोती भोसले यांच्या बचत गटाने जेवणाची व्यवस्था केली.

    आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वात जास्त मेहनत श्री. हृषीकेश कोळेकर व परेश भोसले यांनी घेतली त्याला माझ्या सह सर्व श्री.सिनकर सर, वैभव गार्डी ,संजय मांडवकर ,सौ. माधुरी पवार, श्रीम. प्रणोती भोसले, श्रीम.सुधा चव्हाण यांनी मदत केली.

     राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी डीएड कॉलेजमध्ये हा कार्यक्रम करण्यास परवानगी दिली त्यामुळे निसर्ग रम्य कोकणी प्रदेशात सृजन यात्रेकरू हरखून, भारावून गेले.

श्री. जगदीश पवार-ठोसर.