बातम्या व साहित्य

*मंडळी नमस्कार ,*         आज सकाळी 11 वाजता गोविंद काळे आले ते थोड्याश्या चिंतेतच. मी म्हटले काळे काय झाल काही अडचण. .       तशी अडचण नाही उलट गेल्या सहा महिन्याची रखडलेली पेन्शनची  रक्कम मिळाली हेच सांगायला आलो होतो. पण बँकेत गेलो ते पैसे देत नाही म्हणाले.. तुमच्या मुलीचे आणि तुमचे एकत्रित खाते आहे मुलीला यावे लागेल अंगठा द्यायला.असे सांगताहेत.        मी व्यस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी काळें सोबत बॅक ऑफ इंडियात माझ्या सहाय्यक देवेशला पाठवले आणि एनीवन च्या परवानगीने ( नियमानुसार ) या खात्यातून पैसे का नाही देता येत याची चौकशी करायला सांगितले.          देवेशचा मला बँकेतून फोन आला, बॅक अधिकारी म्हणतात की काळे यांच्या घरि मुलीची सही घेण्यासाठी बॅंकेच्या प्रतिनिधीला बॅंकेच्या पी सी पाॅईट मधून घेऊन जावे लागेल त्यांच्यासमोर मुलीचा अंगठा चलनावर मिळाला की काळे यांना (तिच्या वडिलांना) पैसे मिळतील.           पी सी पाॅईट मधे बॅक कर्मचारी नव्हता.त्याचा फोन नंबर घेऊन त्याला फोन केला .तो पाचलला गेलेला .तो विनंती केल्यावर दिड तासाने आला. तोपर्यंत काळे स्टुडिओत बसून होते.           बॅक प्रतिनिधीकडे ज्या चलनावर मुलीची सही घ्यायची ते चलन नव्हते. बॅंकेचा लंच ब्रेक संपेपर्यंत थांबणे भाग होते.दरम्यान बॅक प्रतिनिधी म्हणाला तुम्हाला  प्रत्येक वेळी पैसे काढताना हे करावे लागेल. काळेंना हे प्रत्येक वेळी शक्य कसे होईल ? मला प्रश्न भेडसावला.            मी , काळे आणि बॅंकेचा प्रतिनिधीला घेऊन बँकेत मॅनेजरना भेटायला गेलो. मॅनेजरने सांगितले एनीवनची सुचना या खात्याला दिलेली नाही म्हणून तुम्हाला प्रतिनिधी समक्ष सही करावी लागेल.मी काळे कुटुंबाची माहीती दिली मुलगी दिव्यांग आहे. तरि खात्यातून एनीवन च्या सुचनेने व्यवहार करता येतील अशी व्यवस्था व्हावी अशी मागणी केली.              मॅनेजरनी एक विहीत नमुन्यातील अर्ज दिला व तो भरून त्यावर प्रतिनिधी समोर अंगठे घ्या तसेच त्यावर काळे बाप- लेकीचे फोटो चिकटवा. हे सारे प्रतिनिधी समोर करताना त्याचा एक व्हिडिओ बनवा व बॅंकेला द्या.             एव्हाना दुपारचे तीन वाजायला आले होते. बॅक चारला बंद होते .मला हे सारे सोपस्कार चार च्या आत पूरे करावे लागणार होते. काळेना गेल्या सहा महीन्यात पेन्शनचा एक रूपया देखील मिळालेला नव्हता.             प्रतिनिधीला घेऊन काळेंसह तडक तिथवली गाठली. काळेच्या घरी पोहचलो प्रतिनिधीने बॅकचे सोपस्कार पार पाडले त्याचा व्हिडिओ केला आणि एक दिड किलोमीटर चालत गाडी पाशी आलो.                 घड्याळाचा काटा आणि गाडीचा स्पिडोमिटर यांच्यात आता स्पर्धा लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते. बॅंकेच्या दारात पोहचलो तेव्हा बॅक बंद व्हायला केवळ तीन मिनिट बाकी होती.                   बँकेची सारी चलने आणि व्हिडिओ मॅनेजरना दाखवले आणि काळे यांना पैसे देण्यास सांगितले. आता काळे कधीही त्यांच्या व मुलीच्या एकत्रीत खात्यातून चलनावर आपला एकट्याचा  अंगठा लावून पैसे काढू शकतात.                     कॅशियरने काळे यांना पैसे दिले. एवढ्यात माझा मोबाईल वाजला पलिकडून.. अहो, साडेचार वाजायला आले, जेवायला कधी येताय….? काळे हातात पैसे घेऊन समाधानी चेह-यानी माझ्या समोर उभे होते… माझे पोट भरले होते..!    @ प्रदीप कोळेकर , विश्वस्त , माय राजापूर.