राजापूरातील लडाख “काजीर्डा”

          डिसेंबर १९९० ला मी सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजिनिअर म्हणून खारेपाटण येथे नोकरीला लागलो. तेथे दीड वर्षे काम केल्यानंतर माझी बदली राजापूरला झाली, सर्व प्रकारच्या कामाची माहिती व्हावी यासाठी सुरवातीला माझ्याकडे वैविध्यपूर्ण कामे देण्यात आली. १९९५ साली माझ्याकडे सागवे, जैतापूर हा सेक्शन देण्यात आला, यामध्ये वाघोटन खाडी ते जैतापूर खाडी हा हायवेच्या पश्चिमेकडील भाग येत होता आणि त्यावेळीपासून नोकरीतील क्षेत्रभेटी (भटकंती) सुरू झाली.
          सन १९९६-९७ साली राजापूर पूर्व भागातील आमच्या सहकाऱ्यांना हार्टचा त्रास सुरू झाला म्हणून त्या सेक्शन मधील अति दुर्गम भागातील कामे करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली, त्यात काजीर्डा राणे वाडी साकव (pedestrian bridge) होता, पाचल परिसरातील कामासाठी क्षेत्रभेट (भटकंती) करताना राजापूर तालुक्याच्या विस्ताराची कल्पना आली.
          काजीर्डा राणे वाडी साकवावर जायचे म्हणजे ५० की.मी. व यायचे ५० की.मी. असे १०० की. मी. चा प्रवास होत असे त्यातील पाचल जवळेथर रस्त्यावर मुरांबा पासूनचा प्रवास म्हणजे काळ्या खडीचा रस्ता. रस्त्यावरील काळी खडी पूर्णपणे उधळलेली असल्याने माझी सुझुकी मोटार सायकल इतकी उडायची की कित्येक वेळा गाडीची चाविही रस्त्यात पडायची, गाडीचे हँडल इतके घट्ट पकडायला लागायचे की काजीर्डा वरून जाऊन आलो की बावळे (खांदे) दुखायचे व तासभर आराम केल्यानंतर दुसरे काम करणे जमायचे. सागवे, जैतापूरची कामे, व ही वाढीव कामे करताना ताण इतका असायचा की काजीर्डा काम करताना इथल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा व आजूबाजूचे सृष्टी सौन्दर्य नजरेत भरले नाही. साकवाचे काम मे मध्ये पूर्ण झाले.
          पहिला मोठा पाऊस झाल्यानंतर नवीन कामे सुस्थितीत आहेत का हे पाहण्यासाठी मी नेहमी फिरत असे, साधारण जुलै मध्ये मी काम पाहण्यासाठी गेलो आणि काजीर्डा गावात जाताना जे सृष्टी सौंदर्य नजरेत पडत होते ते अवर्णनीय होते. सहयाद्रीच्या पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केला होता, आकाशाला भिडणाऱ्या पर्वत रांगा ढगांनी झाकल्या गेल्या होत्या मध्येच ढग विरळ झाले व सूर्यप्रकाश पडला आणि समोर जे दृश्य दिसले त्यांने मी स्मितीत, स्तब्ध झालो, आकाशातून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारा जमीनीचा वेध घेत होत्या. मला स्वर्गात असल्याचा भास झाला. आकाशात जमलेले पावसाचे ढग, त्यातून डोकावणारी सहयाद्रीच्या उंचच उंच शिखरे, त्यातून शंकराच्या जटामधून वाहते तसे पांढरे शुभ्र जलधारा जमिनीवर कोसळताना मध्येच दरीत हरवणारा प्रपात, डोंगर उतारावरची शेतीची खाचरे, पायथ्याशी गर्द झाडीत हरविलेली कोकणी कौलारू घरे, भातशेतीच्या मळ्या, त्यात राबणारे शेतकरी व रस्त्याच्या कडेने खळखळून वाहणारा ओढा. निसर्गसौंदर्याचा अविस्मरणीय नजराण्याचा मी आस्वाद घेत होतो. संध्याकाळची वेळ होती म्हणून लगबगीने साकवाचे काम पाहिले, काम सुस्थितीत होते, आजूबाजूचे वातावरण पाय हलू देत नव्हते पण पावसाळा व संध्याकाळ असल्याने मला जड मनाने परत फिरणे भागच होते. राजापूरला आल्यावर काजीर्डा गावात अविस्मरणीय निसर्गसौंदर्य पाहायला परत कधी जातोय असे झाले होते.
          १५ ऑगस्टला ऑफिसचे झेंडा वंदन आटोपून माझे सहकारी मुकादम श्री. ठाकूर व मी PENTAX K-1000 कॅमेरा घेऊन काजीर्डा गावात गेलो. गावांत गाडी लाऊन पाउलवाटेने धबधबा दिसतोय तिकडे जाऊ लागलो. शेतकरी नाचणी पीक टोवत होते, गुराखी त्यांची गुरे डोंगरावर चरवत होते, वातावरणात सुखद गारवा होता, डोंगराच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही थांबून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होतो, फोटो काढत होतो, शेवटी धबधब्याचे तीन टप्पे दिसतील अश्या डोंगरावर आम्ही थांबलो, समोरील दृश्यामध्ये काय बघू आणि काय नको असे झाले होते. धबधब्याच्या दिशेने सूर्य असल्याने धबधब्याचे मानाजोगते फोटो (against light) येत नव्हते, पण पर्वत रांगा, गर्द झाडी व त्यातून खळखळणारा ओढा यांचे फोटो छान येत होते. येताना खायला काही आणलेलं नसल्याने व गावांत काही सोय नसल्याने आम्ही दुपारी माघारी फिरलो.
          काजीर्डा गांव हे राजापूर ते ओणी १२ की.मी, ओणी फाटा ते पाचल २१ की.मी., पाचल ते मुरांबा ६ की. मी. व मुरांबा ते काजीर्डा ७.०० की. मी. आहे. राजापूरहून गोठणे मार्गे सौदळ, पाचल असेही जाता येते. प्रत्येक पावसाळ्यात कधी ऑफिसच्या माणसांना घेऊन तर कधी बालमित्रांचा "मित्रत्व" ग्रुप बरोबर, तर कधी बरोबर येईल त्याला घेऊन काजीर्डा गावात पावसाळ्यात जाणे होत होते. पावसाळ्यातील उत्साहवर्धक (inspiring, refreshing) ठिकाण म्हणून आमचे पाय आपसूक तिकडे वळायचे. काजीर्डा येथे जाताना सकाळी लवकर निघायचो, सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण सोबत घेऊन पाटीलवाडी येथे गाडी लावून सुरवातीला मळलेल्या पाऊलवाटेने चालायला सुरुवात करायचो भातलावणी, नाचणी टोचणी, चालू असायची, पावसाच्या ढगांनी सहयाद्री व धबधबा झाकलेला असायचा, अचानक एखादी झोडपणारी पावसाची सर यायची व नंतर आकाश निरभ्र व्हायचे व सहयाद्रीची शिखरे व फेसाळत कोसळणारा धबधबा दिसायचा मग फोटो काढण्यासाठी आमची धांदल उडायची व स्टँड वर कॅमेरा लावून पटापट फोटो काढायचो, स्थानिक शेतकरी गुरे चरविणे गुराख्या सोबत एक कुत्राही असायचा, झाडाच्या सालीपासून बंद काढणे, पिकाव, खोऱ्याला लाकडी दांडा करणे, या गोष्टी करत आजूबाजूला असायचे त्यामुळे भीती वाटायची नाही. दम लागला की थांबायचे त्यांची चौकशी करायची, काजीर्डा धरणाचे काय झाले व इतर गप्पा व्हायच्या. काजीर्डा धरण झालं तर आमचं गांव उठवणार व आम्हाला आमचं गांव सोडायचं नाही यावर गावकरी ठाम आहेत. पूर्ण भूसंपादन व पुनर्वसन न करताच काम सुरू करण्याची घाई केल्याने धरणाचं काम बंद पडलंय हे लक्षात येतं. गावकरी मात्र साधे, मदत करणारे व कोणतीही अनाठायी भीती न दाखविणारे आहेत, त्यामुळे येथे फिरताना सुरक्षित वाटते. ते धबधब्यावर कसे जायचे याचे मार्गदर्शन करायचे व धबधब्याच्या वरच्या बाजूला पडसाळी हे पन्हाळा तालुक्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे व तेथे धरण बांधले आहे, त्याच धरणातील नाल्याचे पाणी जे पश्चिमेकडे पडते ते म्हणजे समोर दिसणारा धबधबा असे सांगायचे. पडसाळी गावांत जाण्यासाठी काजीर्डा येथून शिवकाळापासून पायवाट आहे, त्या गावात आमचे सगे, सोयरे आहेत त्यामुळे या दोन गावातील लोकांचे जाणे येणे चालू असते, पडसाळीतून पुढे बाजारभोगावं बाजार भरतो तेथून पूर्वी बाजार राहाटही होत असे. आत्ता रस्ते झाले व पाचल बाजारपेठ आम्हांला जवळ व सोयीची पडते. अश्या अनेक गोष्टी आम्हाला गावकऱ्यांच्या गप्पातून कळायच्या.
          पाऊलवाट संपली की नंतर डोंगराच्या शिरेवरून (ridge) चालत धबधब्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो, दोन्ही बाजूला तीव्र उतार, पावसामुळे गावतावरून पाय घसरण्याची शक्यता, आपल्या जवळ आलेले ढग, समोरील विहंगम दिसणारे दृश्य ह्यामुळे आपण स्वर्गातून चालतोय असे वाटायचे. आमच्या ग्रुपमधील चालण्याची सवय नसलेले मध्येच थांबायचे, त्यांना खायचे साहित्य ठेऊन बाकीचे पुढे चालायचे, असे वाटेत दोन तीन ठिकाणी सहकारी थांबायचे, काही मोजकेच धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्यापाशी पोहचायचे. मी ही मध्येच थांबायचो व सभोवारचे नयनरम्य वातावरण बघत बसायचो, त्यावेळी काजीर्डा ते पडसाळी पाऊलवाटेने चालत जावे असे वाटायचे, या पाऊलवाटेने जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हे महिने नवीन माणसांना योग्य आहेत असे गावकरी सांगायचे. जाऊन यायला चार पाच तास लागणार असल्याने पावसाळ्यात अचानक मोठा पाऊस आला तर पायवाटेवरील नाले ओलांढणे जिकरीचे असते व शेवटाला दगड मातीही वाहून येऊ शकते व उन्हाळ्यात (एप्रिल, मे) ऊन खूप असल्याने नवख्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च मध्ये या पाऊल वाटेने सहयाद्री चढावा हे मनात असूनही कामाच्या व्यापात योग जुळून येत नव्हता.
          मी २०१३ साली नोकरीला बावीस वर्षे झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली व स्वतःचा बांधकाम सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला, त्याच बरोबर "शेती, फलोत्पादन, पर्यटन" याद्वारे कोकणचा शाश्वत विकास होऊ शकतो म्हणून प्रचार, प्रसार, प्रबोधन करून समाज काम करण्यासाठी "माय राजापूर" ही संस्था सहकारी मित्रांसोबत स्थापन केली. राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेटी देणे, नवीन पर्यटन स्थळे शोधून काढणे व त्यांना myrajapur.in वेबसाईटवर प्रसिद्ध देणे, फेसबुकवर, सोशल मीडियावर, वृत्तपत्रातून प्रसिद्ध देण्याचे काम सुरू केले.
          काजीर्डा गावातील सहयाद्रीच्या पर्वत रांगा, उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगर, दऱ्या, खळखळून वाहणारे ओढे व भौगोलिक रचना पाहता काजीर्डा म्हणजे राजापूरचे लढाख असे मला वाटले व तशी प्रसिद्धी देण्यास सुरवात केली, त्याच वेळी काजीर्डा ते पडसाळी पाऊलवाटेने जायचेही निश्चित केले व तो दिवस उजाडला.
          दि. १० मार्च २०१९ रोजी "माय राजापूर" ग्रुपचे सदस्य सर्व श्री. दत्तप्रसाद सिनकर, सुबोध कोळेकर, हृषीकेश कोळेकर व मी काजीर्डा पर्वत चढाईची सर्व तयारी त्यात पाणी, बिस्किटे, आझाद बेकरीचे अफलातून, नानकटाई, दोरी, कोयता, टोपी, गॉगल, कोकम सरबत हे साहित्य घेऊन सकाळी ६.४५ वाजता राजापूर हून निघालो व ८.०० वाजता काजीर्डा दत्त मंदिर येथे पोहचलो. दत्त मंदिर जवळ गावकरी होते नेहमीप्रमाणे प्राथमिक चौकशी करून व पडसाळी गावांत जाणाऱ्या वाटेची चौकशी केली व श्री. अशोक कदम यांना राजापूरचा शिवकालीन इतिहास असलेला "शिवराजस्पर्श्" ग्रंथाची एक प्रत भेट दिली व गावकऱ्यांचा निरोप घेऊन खडी, मातीच्या रस्त्याने चालायला सुरुवात केली.
          रस्त्याने चालताना समोर सहयाद्रीच्या भव्य दिव्य पर्वत रांगा दिसत होत्या, थोडं चालल्यावर लहान डोंगरासारखा उंचवटा आहे, पाशाणाचाच एक भाग आहे त्याला स्थानिक गावकरी "म्हातार धोंड" असे म्हणतात पण असे का म्हणतात ते मात्र सांगू शकले नाहीत. त्यानंतर पावसाळ्यात सहयाद्री कडून येणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेले कोरडे ठाक नाले लागतात, नाल्याच्या पात्रातील दगड, गोट्यांचा (pebble) आकार पाहून पावसाळ्यात पाण्याला चांगलाच वेग असणार हे जाणवत होते. चालण्याचा वाटेच्या उजव्या बाजूला मुख्य ओढा होता त्यात काही ठिकाणी पाणी दिसायचे उर्वरित ओढा मात्र काळ्या (trap) दगड गोट्यांनी भरलेला होता.
          पाऊलवाटेने चालताना आजूबाजूला वेगवेगळ्या वनस्पती, झाडे होती, रस्त्याच्या व ओढ्याच्या कडेला एक शेवरीचे झाड होते. संपुर्ण पानगळ झालेला निष्पर्ण वृक्ष त्याच्या फांद्यांच्या समांतर रचनेने व लाल भडक फुलांमुळे लक्ष वेधून घेत होता. पाऊल वाटेने चालताना शिशिरात पानगळ झालेल्या वृक्षांना नुकतीच तांबूस लाल,पोपटी रंगाची पालवी यायला लागलेली जणुकाय आमच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ चैत्राच्या गुढी प्रमाणे उभे केलेले जागोजागी दिसत होते. आम्ही साधारण सव्वा दोन की. मी. अंतर कापल्यानंतर खऱ्या अर्थाने घाटी सुरू झाली. एक माणूस जेमतेम जाईल अश्या उभ्या चढाची घाटी (पाऊलवाट) सुरू झाली. आजूबाजूला जंगल व एका बाजूला दरी असा पायी प्रवास सुरु झाला. वाटेवर लाल फुलांची धायटीची व शेंगेसारखे गुच्छ असलेली झुडूप वर्गातील वनस्पती, फुललेले मोवईचे झाड, पायवाटेच्या उजव्या बाजूला सहयाद्रीच्या टोकावर दिसणारे मुढागडचे बुरुजासारखे अवशेष, गव्यांना आवडणारी कारवीची वनस्पती, आपटा, कींजल, अंजनी व इतर जंगली वृक्ष पार करत एक सपाट जागेवर आलो तेथे मातीजमीन होती व पावसाळ्यात माती ओली असताना तेथून गव्यारेड्यांचा कळप जात असल्याने त्यांच्या पायाचे ठसे सगळीकडे दिसत होते. तेथेच एक जांभळाच झाड आपला आटोपशीर आकारात उभे होते तेथे विश्रांतिसाठी आम्ही थांबलो व आमच्या जवळील अफलातून, बिस्किटे व चहा पिऊन ताजेतवाने झालो व त्यानंतर चहूबाजूच्या प्रदेशावर नजर टाकली व प्रदेश न्याहाळला. पावसाळ्यातील रमणीय वातावरण नसले तरी सहयाद्री पर्वत रांगांचा उंच सखलपणा, दऱ्या, डोगर यांच्यामुळे सहयाद्रीचा रांगडेपणा नसजरेत भरत होता. सहयाद्रीच्या पर्वत रांगावर पडलेल्या सुर्यप्रकाशामुळे व गडद सावल्यामुळे पर्वतरांगांची उंची व खोलीचा अंदाज येत होता व आपण त्यावर स्वार आहोत हे जाणवले की अंग उत्साही व रोमांचित होत होते. विश्रांती आटोपून पुढच्या प्रवासाला आम्ही सुरवात केली.
          आत्ता पन्नास साठ पावले चालली की श्वास फुलत होता, धाप लागत होती. २००-३०० मीटर चालल्यावर वाटेतच बसावे लागत होते. वाटेच्या आजूबाजूला वेगवेगळ्या रंगांची फुले असली झुडुपवर्गीय (bush type) झाडे होती, एका ठिकाणी निष्पर्णीय मोठे झाड उभे होते हे झाड कोठले असेल याचा आम्ही अंदाज घेत घेत झाडाजवळ पोहचलो त्यावेळी कळले की हे पंगेराचे झाड आहे. संपूर्ण झाडावर दोन ठिकाणी लाल रंगाची फुले नुकतीच उमलत होती, थोडया दिवसांनी हा वृक्ष लाल फुलांनी बहरून येईल व त्यावर अनेक पक्षी दिसतील.
          पुढे पुढे चढाव अधिक तीव्र होत होता. सहयाद्रीच्या कडे कपारीत मध्येच एखादे आपटा, अंजणी, किंजळ अशी झाडे दिसत होती, मध्येच विश्रांतीसाठी बसलो असताना सुगंधी वास दरवळला म्हणून बघितले तर सुरुंगीचे झाड फुललेले होते. त्याचे व फुलांचे आम्ही फोटो घेतले व पुढे प्रवास सुरू केला, आत्ता आम्ही अंतिम टप्प्याच्या जवळ आलो असे वाटत होते, वाट अधिक बिकट होत होती, वाटेच्या डाव्या बाजूला दरीच्या बाजूला उंबराची झाडे होती, त्याच्या फळांचा वास आसमंतात भरून राहिला होता व त्याच्या शेजारी पांढरी फुले असलेले मेडशिंगीची दोन तीन झाडे होती. आम्ही शेवटच्या टप्प्यावर असल्याने उंचावरून सहयाद्रीच्या पर्वत रांगा व पायथ्याशी असलेला विस्तीर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता व उंचीमुळे नजर भिरभिरत होती, छाती दडपून जात होती. उभ्या कड्यातील पाऊलवाट आम्ही चढल्यावर चहोबाजूने वृक्ष, वेली यांनी वेढलेली वातावरण खूपच आल्लादायक होते, तेथेच काळ्या पाथरीवर उगवाई देवीचे स्थान आहे. आम्ही देवीला नमस्कार केला व तेथील पातेऱ्यावर अंग झोकून दिले. पूर्ण सहयाद्री चढल्यावर दमायला झालेले व पायही भरून आलेले, तेथील शांत, निसर्गरम्य व आल्लादायक वातावरणामुळे शरीर पुन्हा ताजे तवाणे झाले व पंधरा मिनिटे आराम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
          वाटेवर अंजनी वृक्ष फुलले होते, बहावाही लांब काळ्या शेंगा घेऊन उभा होता व चहूबाजूला गर्द झाडी होती. आत्ता आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याची हद्द लागली वन विभागाचा बोर्ड असलेलं व वन्य प्राण्यांना पाणी मिळावे म्हणून खोदलेलं "वनतळे" लागलं, त्यात पाणी मात्र नव्हत. आम्ही पडसाळी गावात प्रवेश केला. आत्ता खडीचा उताराचा रस्ता सुरू झाला, आजूबाजूला शेतीत ऊस, मका व इतर पिके होती. गांवकरी गुरे, म्हशी घेऊन घरी चालली होती. उतार संपल्यावर पडसाळीची जांभळी नदी लागली याच नदीवर धरण बांधलं आहे, त्यातून केलेल्या विसर्गामुळे नदीला यादिवसातही पाणी वाहत असते हे गावकऱ्यांशी केलेल्या चर्चेतून कळले. नदीवर स्रिया कपडे धूत होत्या, पुरुष बैलांना साफ करत होते, गुरे, म्हशी पाणी पीत होते, लहान मुले रविवारची सुट्टी असल्याने पाण्यात खेळत होती. आम्हालाही पाण्यातून जावे लागले, यावेळी थंड पाण्याचा पायांना झालेला सुखद स्पर्श आमचा थकवा कमी करणारा ठरला. नदी ओलांडून आम्ही पडसाळी गावांत पोहचलो. काजीर्डा ते पडसाळी आम्हाला साधारण अडीच तास लागले. पडसाळी प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या छोट्या दुकानात डोकावलो व तेथे कोल्डड्रिंक ची बॉटल घेऊन शाळेतील व्हरांड्यात सोबत आणलेले अफलातून, बिस्किटे खाल्ली व थोडावेळ आराम केला, शाळेच्या भिंतीवर अनेक माहिती असलेले तक्ते रंगविलेले होते (ज्ञानरचनावाद पद्धतीने शैक्षणिक वातावरण निर्मिती साठी), अंगण मस्त सारविलेले होते, आजूबाजूला माणसांची, मुलांची ये जा चालू होती. गावचं गावपण अजून टिकून होत. थोडा आराम करून आम्ही धरणाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
          वस्तीतून धरणाच्या (लघुपाटबंधारे तलाव) रस्त्याने आम्ही धरणाच्या भिंतीवर पोहचलो. धरणातील अडविलेले निळेगार पाणी बघून डोळयांना आराम मिळाला. हे मातीचे धरण आहे (earthen dam) मातीच्या वरच्या बाजूला काळ्या दगडाचे pitching केलेले आहे, ज्यामुळे पावसाळ्यात मातीची धूप होऊ नये. धरणाच्या भिंतीवरून चालत आम्ही कालव्यात पाणी सोडवायची जागा(हेड रेग्युलेटर )जवळ आलो, तेथून कालवा काढून पाणी जांभळी नदीत सोडले होते. धरणाच्या भिंतीवरून आम्ही पलीकडे आलो.धरणाच्या पलीकडे विसर्गातील पाण्यात आम्ही हात पाय धुऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
          उगवाई देवीच्या स्थानाजवळ पंधरा मिनिटे पातेऱ्यावर अंग टेकलं व भर दुपारी एक वाजता घाट उतरायला सुरुवात केली. उतरतीची वाट होती पण भर दुपारचे ऊन अंग भाजून काढत होते. वाटेत मध्ये मध्ये थांबत आम्ही पायथ्याशी पोहचलो. येथून पुढे सपाटी असल्याने हायसे वाटले, तेथून अडीज की.मी. अंतर राहिले होते, पण उन्हाने शरीराची इतकी लाही लाही होत होती की झाड दिसलं की आम्ही थांबत होतो. शेवटी तीन वाजता आम्ही काजीर्डा दत्तमंदिर जवळ पोहचलो व मंदिराच्या कठड्यावर झोकून दिलं. थकवा खूप आला होता. थोडं बरं वाटल्यावर उठून जवळच्या विहिरीवरून पाणी काढून चेहरा, हात, पाय धुतले व राजापूच्या परतीच्या प्रवासाला गाडीत बसलो.
          सकाळी घाट चढायला सुरुवात केली त्यावेळी वातावरणात आल्हाददायक गारवा होता, पडसाळीत जाई पर्यत उभ्या घाटीमुळे दमायला होत होतं पण उत्साह कमी होत नव्हता, पण येताना भर दुपारची वेळ निवडल्याने अंगातून गरम वाफा निघत होत्या व हरमळायला होत होते. आम्ही दुपारी तीन पर्यंत पडसाळी येथे थांबून नंतर परतीचा प्रवास सुरु केला असता तर इतका त्रास झाला नसता.
          हे एक दिवसाचे गिर्यारोहन अभियान आमची शारीरिक क्षमता जोखणारं, सहयाद्रीची जैवविविधतेचे दर्शन घडवणारं, सहयाद्रीची भव्यता दर्शविणारं व छ. शिवराय व मावळे ज्या प्रदेशात सहजपणे वावरले त्यांच्या अंगीभूत शमतेचं, पराक्रमाची साक्ष देणारं व शिवकाळाचा सार्थ अभिमान दृढ करणारं ठरलं हे मात्र निश्चित.
          पण त्याबरोबरचं आमच्या आयुष्यातील भविष्यात धेय्याच्या वाटेवर येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे बळ देणार ठरेल हे मात्र निश्चित.
श्री. जगदिश बंडोपंत पवार-ठोसर.
राजापूर.