राजापूर तालुक्यातील पर्यटन विकास करण्यासाठी

*”राजापूर तालुक्यातील पर्यटन विकास करण्यासाठी”*
देवगिरीच्या यादव काळापासून राजापूर ही प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. अलाउद्दीन खिलजीने देवगिरी राज्य इ. स.१३१२ मध्ये खालसा केले,त्यावेळी राजापूर जिंकून आपल्या राज्यास जोडले.इ. स.१६३८ मध्ये राजापूर हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. आदिलशाही राज्यात इंग्रजांनी राजापूर येथे १६४९ मध्ये व्यापाराकरता वखार बांधली. छ. शिवाजी महाराज हे पन्हाळगड येथे सिध्दीच्या वेढ्यात अडकले असताना राजापूर वाखारीतील मुख्य हेनरी रेविंगटन या इंग्रज अधिकाऱ्याने सिद्दीला लांब पल्याच्या तोफा, दारुगोळा व गोलंदाज देऊन मदत केली होती हे महाराजांनी पन्हाळगडावरून पाहिले होते, त्यामुळे पन्हाळगडावरून सुखरूप सुटका झाल्यानंतर इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी १६६१ मध्ये महाराजांनी कोकणावर स्वारी करून राजापूर येथील इंग्रज वखार लुटली व राजापूर आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यास जोडले. असा समृद्ध ऐतिहासिक वारसा राजापूरला लाभला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका म्हणजे पूर्वेकडे जैवविविधतेने समृद्ध सहयाद्री व पश्चिमेकडील अथांग अरबीसमुद्र यांच्या मध्ये अनेक डोंगर, दऱ्या,ओढे, नाले, नद्या व जांभ्या दगडाची विस्तिर्ण पठारे.राजापूर तालुक्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे, तसा नैसर्गिक चमत्कार व विज्ञानाला आव्हान असलेली गंगा म्हणजे “गंगामाई” लाभली आहे. अनियमित कालावधीने, आजूबाजूच्या परिसरात पाणी टंचाई असताना डोंगरावर अचानक पाण्याचे झरे सुरू होतात व सगळी कुंडे भरून जातात. सतत तीन चार महिने हा पाण्याचा प्रवाह अखंड वाहत असतो व भर पावसात हळू हळू लोप पावतो तो अनिश्चित काळासाठी. यालाच राजापूरची गंगा असे म्हटले जाते. याच गंगेच्या खाली साधारण ७००-८०० मीटर अर्जुना नदीलगत अविरत वाहणारे गरम पाण्याचे झरे आहेत.निसर्गाचा हा अलौकिक चमत्कार आहे,”जेथे चमत्कार असतो, तेथे नमस्कार असतो” अशी भारतीय संस्कृतीत म्हण आहे, त्यामुळे या स्थळांना अनन्यसाधारण धार्मिक महत्व आहे, त्यामुळेच राजापूरला दक्षिण काशी म्हटले जाते. अश्या राजापूर तालुक्यात धुतपापेश्वर मंदिर, देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर, कशेळी येथील कनकादित्य मंदिर, बिनीवले पेशव्यांनी बांधलेले तेरवण येथील विमलेश्वर मंदिर, मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती बापू गोखले यांनी प्रिंदावन येथे बांधलेले मल्लिकार्जुन मंदिर अशी अनेक पुरातन काळापासूनची मंदिरे आहेत.
ऐतिहासिक वारसा लाभलेले, पुरातन मंदिरे असलेले , जुने वाडे वजुनी बाजारपेठ व अवर्णनीय निसर्गसौदर्य लाभलेले राजापूर म्हणजे पर्यटनासाठी नंदनवन. पर्यटनातून स्थानिक जनतेचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याची क्षमता निसर्गाने राजापूरला दिली, पण स्थानिक जनतेच्या, लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीनतेमुळे राजापूर विकासापासून वंचित व रूढार्थाने मागास तालुका राहिला आहे.
धार्मिक स्थळांवर खाजगी मालकी, पर्यटन वाढीसाठी सोई सवलतींची वानवा, पर्यटन स्थळांवर अरुंद व निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाहनतळांची वानवा यामुळे “गंगा”सारखे जागतिक नैसर्गिक आश्चर्य असलेल्या ठिकाणाला शासनाने “क”वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून दिलेला दर्जा व त्यामुळे पर्यटन सोई सवललतींकडे केलेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे तालुका व जिल्हा पातळीवरील धार्मिक पर्यटक वगळता, बाहेरील पर्यटकांना या पर्यटन स्थळाची माहिती नाही. हीच परिस्थिती सर्व पर्यटनाबाबत राजापूर तालुक्यात दिसते.
राजापूर तालुक्याला लाभलेल्या या पर्यटन पूरक उपलब्धतेचा फायदा घेऊन, निसर्गाची, पुरातन वास्तूची जोपासना करत योजनाबद्द विकास आराखडा करून ,त्याची अंमलबजावणी केली तर आधुनिक भारतात दक्षिणीचे काश्मीर म्हणून राजापूर जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीला येईल. त्यासाठी खाजगी मालकी असलेली धार्मिक तीर्थक्षेत्र ही स्थानिकांना विश्वासात घेऊन व त्यांचा सहभाग घेऊन विश्वस्त मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. स्थानिक जनतेला पर्यटन विषयक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रचार, प्रसार, प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रम राबविणे व स्थानिक सामाजिक संस्थाना यासाठी प्रोत्साहन देणे. (“माय राजापूर”संस्था अश्या प्रकारचे काम करण्यासाठी स्थापन झाली आहे),शासनाने पर्यटन स्थळांवर जाणारे सर्व रस्ते दुपदरी व चांगल्या दर्जाचे करणे व पर्यटन स्थळांवर मोठे व सुरक्षित वाहनतळ उभारणे आवश्यक आहे.पर्यटन स्थळांचे मार्गदर्शन फलक रस्त्यावर लावणे, तसेच विनाखंडीत वीज, इंटरनेट सेवा पुरविणे आवश्यक आहे. त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यटन निधी देऊन पर्यटकांची सुरक्षितता, परिसराची स्वच्छता, शुद्द व पुरेसे पाणी व्यवस्था याची जबाबदारी देऊन त्यावर शासनाने लक्ष ठेवले पाहिजे. पर्यटकांच्या राहण्याची, जेवण्याची व इतर सोईसुविधा पुरविण्यासाठी स्थानिकांना तयार केले पाहिजे व त्यांना विविध शासकीय परवानग्या तात्काळ दिल्या पाहिजेत उद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासनाने बँकांना पर्यटन योजना बनवून देऊन सुलभ अर्थ पुरवठा केला पाहिजे.
राजापूर शहराला वास्तू वारसा (heritage town ) शहर म्हणून घोषित करून, जुन्या वास्तू घटकांची जपणूक, निगा व त्यापासून मिळणारा फायदा ह्याचे महत्व पटवून देऊन, स्थानिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत,त्याबरोबर धोकादायक इमारत म्हणून पाडण्यात आलेल्या इंग्रज वखारीचे पर्यटन दृष्ट्या महत्व ओळखून पुनर्निर्माण करणे आवश्यक आहे. समुद्रकिनारी MTDC ची स्थापना करून पर्यटनातून विकासाची दिशा दाखवून स्थानिकांना पर्यटन पूरक व्यवसाय करून चांगली आर्थिक, सामाजिक प्रगती करता येते हे पटवून देणे आवश्यक आहे.राजापूर तालुक्याची पर्यटनातून समृद्धी आणण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी व शासन यांनी एकत्रित सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
श्री. जगदीश बंडोपंत पवार-ठोसर.
अध्यक्ष,”माय राजापूर”संस्था, राजापूर.