आंबोळगड समुद्रकिनारा

आंबोळगड समुद्रकिनारा :-
राजापूर – धारतळे मार्गे आंबोळगड हे अंतर ३५ कि. मी. आहे. राजापूरात वाळूच्या किनार्‍याची सर्वाधिक लांबी ही आंबोळगडची आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघणारी सोनेरी वाळू आणि फेसाळणार्‍या लाटा यांच्याशी मस्ती करताना वेळ कधी निघून जातो कळत नाही.
संध्याकाळच्या वेळी या समुद्रकिनार्‍यावर देहभान विसरायला होते. स्थानिक मुले वाळूत क्रिकेट खेळत असतात. बाल सवंगडी वाळूत सायकलचे टायर फिरवत किनार्‍यावर नक्षी काढत असतात. मच्छिमार छोट्या होड्यातून पागून आणलेले मासे होडी किनार्‍याला लावून घरी घेऊन जात असतात. समुद्र किनार्‍यावर वाळूत विखुरलेले रंगबिरंगी शंख- शिंपले जमा करण्यात पर्यटक गुंग असतात. काही पर्यटक पाण्यात मनसोक्त डुंबत असतात. खरच खूप मनसोक्त निसर्गाचा आस्वाद घेण्याचे हे पर्यटन स्थळ आहे.
समुद्रकिनार्‍यापासून १ कि. मी. अंतरावर जांभ्या कातळाच्या पठारावर श्रीगगनगिरी स्वामींचा मठ आहे. तेथूनही समुद्रकिनारा सुंदर दिसतो. समुद्राच्या लाटा जोरदार दगडावर आपटताना, उडणारे पाणी आणि निर्माण होणारे तरंग मन प्रसन्न करून टाकतात.