चाहूल माय राजापूरची

चाहूल “माय राजापूरची”
“राजापुरात हाय काय?” सर्वसाधारण राजापूरकरांचा राजापूरबद्दल चर्चा करताना येणारं वाक्य. असं ऐकलं की मला खूप अस्वस्थ वाटायच. मी (जगदीश बंडोपंत पवार-ठोसर) राजापूरात जन्मलो; वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत माडबन, धाऊलवल्ली व केळवलीत वाढलो. त्यानंतर राजापूर शहरात वाढलो. सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजिनीअर म्हणून काम करताना बारा वर्षे म्हणजे एक तप राजापुरात काम केले.
संपूर्ण राजापूर तालुका कामानिमित्त फिरलो. नोकरीत असताना सुट्टी घेऊन बऱ्यापैकी भारत फिरलो, त्यात गोवा व केरळ मध्ये फिरताना जे निसर्ग सौंदर्य राजापुरात आहे तेच निसर्ग सौंदर्य या दोन राज्यात आहे हे प्रकर्षाने जाणवल. या दोन्ही राज्यांनी पर्यटन व्यवसायातून खूप चांगली आर्थिक प्रगती केली आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय हे जाणवल, निसर्गसौंदर्याच्या सुक्ष्मतण लेण्यांनी अलंकृत झालेलं आपलं “राजापूर” आहे हे पटलं. “देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी” ह्या म्हणीचा प्रत्यय राजापुरात येतोय. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय पण त्याचा उपयोग करून आपण आपला, समाजाचा विकास करू शकत नाही हे वास्तव मन अस्वस्थ करत होत. राजापुरसाठी, राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ वाढू लागली. आपण आपल्या कुवतीप्रमाणे काय करू शकतो याचा विचार करू लागलो आणि आशेचा किरण दिसला.
विद्यार्थी दशेत मला चित्रकलेची खूप आवड होती कै. केळकर सरांसारखे शिक्षक चित्रकलेला लाभल्याने माझ्या कला विषयक जाणीवा, नैसर्गिक सौंदर्याबद्दलची अभिरुची वाढीस लागली पण नोकरीतील कामाच्या व्यापामुळे मी हा छंद ही आवड जोपासू शकत नव्हतो म्हणून फोटोग्राफीकडे वळलो. कै. नाखरे गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे फोटोग्राफितील कौशल्य शिकून घेतली व फोटोग्राफी छंद म्हणून जोपासू लागलो.
“राजापूरची बलस्थाने” (Strong points of Rajapur) या विषयावर छायाचित्रण सुरू केले. नोकरीला २२ वर्षे पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी २०१३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली व स्थापत्य अभियंता सल्लागार म्हणून राजापुरात काम करू लागलो.
२०१५ हे राजापूर हायस्कूलला १२५ वर्ष पूर्ण झाली म्हणून “शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष”. अशा वेळी राजापुरात शिक्षणासाठी असलेले व नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी स्थिरावलेले असंख्य माजी विद्यार्थी राजापुरात येणार हे जाणून त्यांना राजापुरात काय हाय? हे दाखवीण्यासाठी राजापुरातली पर्यटन स्थळे या विषयावर मी व नवयुग फोटो स्टुडिओचे मालक श्री. प्रदीप (छोटू) कोळेकर दोघांनी छायाचित्र प्रदर्शन भरविण्याचे ठरविले व छायाचित्रणासाठी संपूर्ण तालुकाभर फिरलो व पर्यटन स्थळांची छायाचित्रे काढली. त्यानंतर प्रदर्शनाला नाव काय काय द्यायचे यावर आम्ही चर्चा करत असताना श्री. कोळेकरांनी खालील कल्पना मांडली.
“आपण ज्या प्रदेशात जन्म घेतला, ज्या मातीत लहानाचे मोठे झालो अशी आपली राजापूरची भूमी म्हणजे आपली “माय” या आपल्या आईच्या कुशीत वाढलो तिने सर्व काही आपल्याला दिले त्या मायभूमीच्या प्रगतीसाठी, विकासासाठी काहीतरी करणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे, त्याचे पाहिले पुष्प म्हणून प्रदर्शनाचे नाव “माय राजापूर” ठेवण्याचे ठरले व हीच माय राजापूरची पहिली मुहूर्तमेढ ठरली.
प्रदर्शन २मे व ३ मे २०१५ रोजी महोत्सव भवन येथे होते. त्याचे उद्घाटक म्हणून जगप्रसिद्ध छायाचित्रकार श्री. श्याम मणचेकर लाभले होते. याच दरम्यान श्री. संजय मांडवकर आमच्यात सामील झाले व माझा भाऊ श्री. संदीप पवार-ठोसर यांनीही मुंबईहून काम करण्याची तयारी दाखवली. तो शिक्षणाने आर्किटेक्ट असल्याने त्याचा आम्हाला फार उपयोग होणार आहे.
त्याच सुमारास राजपुरला श्री. सुशांत खांडेकर हे प्रांत अधिकारी म्हणून लाभले. त्यांना राजापूरच्या निसर्ग सौंदर्याने मोहित केले व राजापूरच्या पर्यटन वाढीसाठी काहीतरी केले पाहिजे हे जाणवले व त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. राजापुरातील पत्रकार श्री. महेश शिवलकर, अँड. श्री. शशिकांत सुतार, श्री. गणेश रानडे (गणेश ऍग्रो टूरीझमचे मालक), श्री. अरविंद पारकर (हॉटेल समिंदर बीचचे मालक), श्री. सुधीर रिसबुड, श्री. धनंजय मराठे, श्री. उल्हास खडपे, सौ. गायत्री कोळेकर, सौ. शिल्पा मराठे व आम्ही तिघे व इतर पर्यटन प्रेमी याना एकत्र करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले त्याची सुरवात “नवदुर्गा दर्शन सोहळा २०१५” ने करण्यात आली. आडिवरे “महाकाली” मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव नऊ दिवस उत्साहात व गर्दीत सुरू असतो. त्यानिमित्ताने नऊ दिवस एकाच दिवशी १) श्री. महाकाली (आडिवरे), २) श्री. आर्यादुर्गा (कशेळी), ३) श्री. जाकादेवी (कशेळी), ४) श्री. कालिकादेवी (वेत्ये), ५) श्री. नवलादेवी (नाटे), ६)श्री. भरतदुर्गादेवी (होळी), ७) श्री. भगवतीदेवी (माडबन), ८) श्री. मुहूर्तादेवी (मिठगवाणे), ९) श्री. कात्रादेवी (सागवे) अशा नऊ सागरकिनारपट्टीजवळील देवींचे दर्शन घेण्याची संकल्पना श्री. खांडेकरांनी मांडली, माय राजापूरने संकल्पना विस्तार केला व सहलीचे संयोजन गणेश ऍग्रो टुरिझम नाटे यांनी केले व वरील सर्व सदस्यांनी त्यात योगदान दिले.
अशाच प्रकारची सहल २०१६ मध्येही आयोजित केली. सहल आयोजनाचा मुख्य हेतू पर्यटनातून आर्थिक विकास होऊ शकतो याचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणे हा होता, त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.
२५ जानेवारी २०१६ रोजी “माय राजापूरचे” छायाचित्र प्रदर्शन नगर वाचनालय राजापूर यांच्या सभागृहात भरविण्यात आले, त्याचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. रविंद्र वायकर यांनी केले त्याप्रसंगी त्यांना राजापूरच्या पर्यटनवाढीसाठी शासनाने काय करावे याचे निवेदनही देण्यात आले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी शिक्षण व क्रीडा मंत्री श्री. पॅट फार्मर अखंड भारत दौरा धावून करण्यासाठी राजापूरच्या सागरी मार्गाने जाणार होते त्यासाठी जानशी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते म्हणून श्री. खांडेकर साहेबांच्या पुढाकाराने “माय राजापूर” हे छायाचित्र प्रदर्शन आम्ही आयोजित केले होते.
त्यानंतर रत्नागिरी पर्यटन महोत्सव चिपळूण येथे झाला त्याठिकाणीही श्री. खांडेकर साहेबांच्या पुढाकाराने आम्ही “माय राजापूरचे” प्रदर्शन भरविले होते.
राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी सर्वसामान्य नागरिकांना जागृत करण्यासाठी, त्याला चेतना देण्यासाठी एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे हे आम्हाला वाटत होत. राजापुरातील निसर्ग सौंदर्य, संस्कृती, धार्मिक  व ऐतिहासिक वास्तु याचा प्रत्येक राजापूरवासीयाला सार्थ अभिमान असला पाहिजे व चांगल्या गोष्टींचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने एखादी संस्था काढावी असे वाटत होते.
राजापूरचा विकास होत नाही, प्रगती होत नाही अशी प्रत्येकाची तक्रार असते, राजापूरचा विकास करायचा असेल तर प्रत्येक राजापूरकरांनी एखाद्या उपक्रमात हिरीरीने भाग घेतला पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक राजापूरकर त्याच्या आवडीच्या एखाद्या उपक्रमात हिरीरीने भाग घेण्यासाठी पुढे येत नाही तोपर्यंत राजापूरचा विकास होणे शक्य नाही.
मानसिक परिवर्तनानंतर वास्तविक परिवर्तन होते. कोणताही सकारात्मक बदल घडविताना प्रथम विचारात बदल घडवून आपली मानसिकता बदलावी लागेल.
राजकीय लोकांना, प्रशासनाला जाब विचारण्याचे धैर्य आपल्यामध्ये आले पाहिजे त्यासाठी आपली मानसिकता प्रगल्भ असली पाहिजे आणि प्रगल्भ मानसिकता घडविण्याचे काम माय राजापूरने केले पाहिजे असा विचार मनात असताना त्याबद्दल माझे मित्र श्री. चंद्रशेखर सिनकर, श्री. संदीप देशपांडे, श्री. समिर देशपांडे, श्री. सुबोध कोळेकर, श्री. वैभव गार्डी, श्री. विलास पळसमकर, श्री. परवडे सर, श्री. नित्यानंद पाटील, श्री. नरेश दसवंत, श्रीमती सुधा चव्हाण, श्री./सौ. धनंजय मराठे यांच्याशी चर्चा होत होत्या व राजापूरची विकासात्मक मानसिकता तयार करणे व गरजवंताना मदतीचा हात देणे या उद्दिष्टासाठी संस्था काढण्याचे निश्चित करण्यात आले व त्याचे नावही “माय राजापूर” ठेवण्याचे निश्चित झाले.
संस्था खालील उद्दीष्टांसाठी काम करील
“शेती, फलोत्पादन व पर्यटन” या त्रिसूत्रीने राजापूरचा शाश्वत विकास होऊ शकतो यासाठी प्रचार, प्रसार व प्रबोधन करणे व त्याच बरोबर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व गरीबांना वैद्यकीय मदत करणे.
“माय राजापूर” हे खुले व्यासपीठ असलेली संस्था स्थापन करून सर्वांच्या सहकार्याने, मदतीने राजापूरच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

जगदीश पवार
प्रवर्तक “माय राजापूर”