चुनाकोळवण धबधबा

चुनाकोळवण धबधबा :-
राजापूर ओणी पासून १२.५० की.मी. अंतरावरील चुनाकोळवण गावातील नैसर्गिक पाण्याचा धबधबा (Waterfall) हा निसर्गाने चुनाकोळवण वासीयांना दिलेले वरदान आहे.
सदर नैसर्गिक ठिकाणाच्या सौंदर्याचे संवर्धन व पर्यटन वाढ व्हावी व जास्तीत जास्त पर्यटकांनी चुनाकोळवण धबधब्याला भेट द्यावी व या अनोख्या सौंदर्याशी जवळीक साधत, मजा लुटावी व हे करत असताना निसर्गाची कमीत कमी हानी व्हावी, पर्यटकांना सुरक्षितता लाभावी ,म्हणून हा पर्यटन क्षेत्राचा विकास आराखडा आम्ही तयार केलेला आहे.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचा विकास शासनामार्फत होत असताना पर्यटन स्थळाच्या मूळ सौंदर्याला बाधा न येता आवश्यक त्या सुविधा निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्या टप्प्याने करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. त्यामध्ये अग्रक्रमानुसार खालील बाबींचा समावेश आहे.
१) मुख्य रस्त्यापासून ओढ्याच्या प्रवाहपर्यंत जाणारी पायवाट. सदर पायवाटेवरील डोंगराचा चढ हा तीव्र म्हणजे एकास एक असल्याने येथे किल्याला असलेल्या वळणदार घाटीसारखी पायवाट बनविणे आवश्यक आहे. अडीच मिटर रुंद काळ्या दगडाची पायवाट बनवून त्याला काळ्या दगडाची पॅरापेट वॉल (धक्का) करणे व मध्ये मध्ये थांबून धबधब्याचे विहिंगम दृश्य पाहता येईल अशा किल्ल्याच्या बुरूजाप्रमाणे गॅलरी बांधणे.
२) ओढ्याच्या काठावर जेथे पायवाट संपते त्याच्या डाव्या बाजूला (Down-stream side) उच्चतम पूर पातळीच्या (High flood level) च्या वरती आर. सी. सी. कॉलमवर आधारित स्लॅबचा प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर स्वच्छता गृह व कपडे बदलण्याच्या रूम तयार करणे (स्विमिंग पूल टाइप). सदर इमारत ही कोकणच्या कौलारू घरासारखी व निसर्गाशी नाते जोडणारी असावी.
३) ओढ्याच्या काठावरून उच्चतम पूर पातळीच्या वरती धबधब्यापर्यंत जाणारी दोन मिटर रुंदीची पाखाडी बांधणे.
४) धबधब्याच्या मंदरुळ बाजूला कमनीय पद्धतीची गॅलरी तयार करून त्यावरून पर्यटक जवळून अनुभव घेतील तसेच पर्यटकांना बसण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी बैठक व्यवस्था करणे व मुख्य गॅलरीच्या खालील बाजूला आणखी एक गॅलरी करून पर्यटकांना धबधब्याच्या अधिक जवळ जाऊन तुषारांसहित उडणाऱ्या पाण्यासह मौजमजा करतील.
५) धबधब्याच्या खाली (Down stream side) १०० मिटर अंतरावर जेथे पायवाट संपते तेथे कमानीवर आधारित पूल तयार करून त्यावरून पर्यटक समोरून धबधब्याच्या व वाहत्या पाण्याचा आनंद घेऊ शकतील.
वरील भौतिक सुविधा (Infrastructure development) आर्थिक निधीच्या उपलब्धतेनुसार होणार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. शासनाने निधी देताना सुचविलेल्या कामाच्या क्रमाने द्यावा. पर्यटन स्थळ विकासाअंतर्गत येत्या १०-१५ वर्षात सुचविलेली सर्व कामे पूर्ण होतील याची आम्हाला खात्री वाटते. कामाची संकल्पना व कामाचा दर्जा याबाबत कोणतीही तडजोड न करता विकास कामे झाली पाहिजेत ही आमची विनंती आहे.

वरील विकासकामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक येतील त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पर्यटन प्रेमी, व्यावसायिक व प्रशासन यांच्या मदतीने खालील पर्यटक पूरक उपक्रम (Activities) राबवून संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांना आर्थिक स्वावलंबी बनविता येईल.
१) स्थानिक उत्पादनाची विक्री करणे. (आंबा, फणस, काजू, कोकम यावरील प्रक्रिया उत्पादने)
२) स्थानिक लोककलांचे सादरीकरण. (दहीकाला, जाखडी, भजन, पालखी सोहळा)
३) योगा व कसरतीचे खेळ.
४) पावसाळी गिर्यारोहण. (Rock climbing, Hiking)
५) उंच झाडावर माचाण बांधून परिसर निरीक्षण व निवास व्यवस्था.
निसर्गाने आम्हाला भरपूर दिले आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि विविध फळे व शेती यावर आजपर्यंतच्या पिढ्या जगल्या.
काळ बदलतोय, भविष्यकाळात कोकणातील स्थानिक माणसांची आर्थिक व सामाजिक प्रगती ही पर्यटन विकास व फलोत्पादन यातूनच होऊ शकते यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी ही अपेक्षा ठेवून आम्ही हा आराखडा तयार केला आहे.

Chunakolvan Waterfall Plan Presentation