धूतपापेश्वर मंदिर

श्री धूतपापेश्वर मंदिर :-
काळ्या पाषाणातून झुळूझुळू वाहणारे निर्मळ, स्वच्छ पाणी, उंचावरून पिंडीवर पडणारे पांढरेशुभ्र दूधपाणी, पैलतिरी असलेले आधुनिक शैलीतील दत्त मंदिर तिकडे जाणारा कमानीदार फुटब्रिज, निसर्गाने कुशीत घेतलंय असे वाटणारे वृक्षांनी बहरलेले डोंगर, आणि मुकूटमणीसारखे असलेले धोपेश्वर मंदिर. येथे आल्यावर श्रीधूतपापेश्वराचे दर्शन तर होतंच, त्याहून अधिक विलोभनिय निसर्गाच्या सौंदर्यामुळे एक प्रकारची आत्मिक शांतता, समृध्दता अनुभवता येते.
हे शिवमंदिर प्राचीन आहे. सुरूवातीला नगारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी द्वारपाल, त्यानंतर दिंडी दरवाजा, त्यातून आत गेल्यावर देवडी, देवडीच्या भिंतीवर पेशवेकालीन चित्रकला प्रकारातील धार्मिक आशयाची चित्रे आहेत.
मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्यावेळी मंदिराचं शिखर हे राजस्थान मधून ढोलपूर दगड आणून नागर शैलीत करण्यात आले. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपारिक रचना आहे. सभामंडप हे लाकडी नक्षीदार खांबावर तोललेले असून पारंपारिक चौपाखी कौलारू छप्पर आहे. देवाचा गाभारा मात्र काळ्या दगडात असून त्याची रचना व कला उच्च दर्जाची आहे. गाभार्‍यातील शिवलिंगाचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे धार्मिक संदर्भ आहे. समस्त राजापूरकरांचं आराध्य दैवत असलेले श्रीधूतपापेश्वर हे जागृत देवस्थान आहे.