कनकादित्य मंदिर

श्री कनकादित्य मंदिर कशेळी :-
राजापूर तालुक्यातील कशेळी हे वायव्यकडे रत्नागिरी तालुक्याला लागून असलेले गाव. भारतातील मोजक्या सूर्यमंदिरापैकी एक मंदिर कशेळी गावात आहे त्याचे नाव श्रीकनकादित्य मंदिर. आडिवरे पासून रत्नागिरीकडे २ कि. मी. अंतरावर डाव्या बाजूला रस्ता जातो तेथून ३ कि. मी. अंतरावर कनकादित्य मंदिर आहे.
मंदिरातील भगवान श्रीसूर्यनारायणाची मूर्ती खूप सुंदर आहे, मूर्ती अतिशय रेखीव गंडशिळेची असून ती जगप्रसिध्द कोणार्कच्या सूर्य मंदिरातील मूर्तिवैशिष्ट्याप्रमाणे आहे.
माघ शुध्द सप्तमी ते माघ शुध्द एकादशी असा पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. ही देवता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रध्दा आहे. देवालयाचे आवार प्रशस्त असून सभोवती चिरेबंदी तटबंदी आहे. आतील सर्व अंगणात जांभ्या चिर्‍याचे फरशी (Paving) आहे.
मंदिराची रचना सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभागृह लाकडी खांबावर तोललेले असून चौपाखी कौलारू छप्पर आहे. गर्भगृहसुध्दा चौपाखी छप्पराराचे असून त्यावर संपूर्ण तांब्याचा पत्रा बसविलेला आहे.
ह्या मंदिराच्या आवारात दुरूस्ती, जीर्णोध्दार करताना वास्तुच्या मूळ रूपाला बाधा येणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्याच गावचे स्थानिक कलाकार श्री. संजय मेस्त्री यांनी जाणिवपूर्वक जांभ्या दगडातील कोरीव काम आत्मसात करून नवीन बांधकाम जुन्या शैलीत करून वास्तूचे मूळ सौंदर्यात वाढ केलेली आहे. मुख्य मंदिरासमोरील श्रीशांतादुर्गा मंदिर, तलावाकडे जाणारी कमान या गोष्टी त्याची साक्ष देतात.
कशेळी गावात कनकादित्य मंदिरापासून साधारण १.५० कि.मी. अंतरावर श्रीलक्ष्मी नारायण मंदिर हे माड, पोफळीतल्या आगारात वसलेले आहे. जुन्या बांधकाम शैलीतील मंदिर सुंदर आहे. कौलारू छप्परासाठी वापरण्यात आलेल्या वाशांची ( Rafter ) सुंदर रचना येथे पाहायला मिळते.
श्रीकनकादित्य मंदिराच्या पश्चिमेला १ कि.मी. वर सुंदर समुद्रकिनारा आहे. जांभ्या दगडाचं विस्तीर्ण पठार व खोलवर असलेला समुद्र हे दृश्य फारच रोमांचकारी आहे. निसर्ग प्रेमींनी या समुद्रकिनार्‍याला अवश्य भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायला हवा.