महाकाली मंदिर

श्री महाकाली मंदिर :-
राजापूर धारतळे आडिवरेमार्गे रत्नागिरी या सागरी महामार्गावर राजापूर पासून २७ कि. मी. वर नवेदर गावी महाकाली देवस्थान आहे.
हे पंचायतन स्वरूपाचं मंदिर असून श्रीयोगेश्वरी, श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती, आणि श्रीरवळनाथ अशी रचना आहे. मंदिरामध्ये महाकालीसमोर उत्तरेस तोंड करून श्रीमहासरस्वती तर उजव्या बाजूला श्रीमहालक्ष्मीची स्थापना केली आहे.
महाकाली नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नऊ दिवस चालतो. याकाळात यात्रेकरूंची प्रचंड गर्दी असते.
पूर्वीच्या जुन्या मंदिराचा जीर्णोध्दार अलिकडेच करण्यात आला आहे. देवतांची स्थाने तिच ठेवून आर. सी. सी. बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराची शिखरे नागर शैलीतील असून सभामंडपावर कोकणी पध्दतीचे आर.सी.सी. छप्पर करून त्यावर कौले लावली आहेत. मंदिरातील अंतर्गत सजावटीसाठी ग्रेनाईट, मार्बल, जैसेलमेर दगड वापरून राजस्थानी कारागिरांकडून सुरेख कोरीव काम केलेले आहे. सभामंडपातील खांबांना लाकडी कलाकुसर करून सजवण्यात आले आहे.
गाभार्‍यातील महाकालीची मूर्ती सुंदर व तेजस्वी आहे. मूर्तीकडे एकाग्र चित्ताने पाहिले असता एक प्रकारची सकारात्मक उर्जा प्राप्त होते. येथे राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असे भक्त निवास आहे.