नर्तकीचा वाडा

ब्रिटिशकालीन नर्तकीचा वाडा, आंबेवाडी राजापूर :-
राजापूर जवाहर चौकापासुन पश्चिमेकडे ४०० मिटरवर पुरातन नर्तकीचा वाडा असून स्थानिकामध्ये “नायकीणीचा वाडा” म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा परिसर राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताब्यात असून इंग्लिश मिडियमची शाळा भरते. राजापूर हे प्राचिन बंदर होते व मोठी व्यापारी पेठ होती. येथे इंग्रजांची वखारही होती. इंग्रज, डच, पोर्तुगिज व इतर भारतीय व्यापारी राजापूरात व्यवसाय निमित्ताने राहत असत त्यांना रात्रीच्या वेळी करमणूक म्हणून भारतीय शैलीचे नृत्य सादर करण्यासाठी या वाड्याचा वापर होत असे असे काही जेष्ठ नागरिकांकडून कळले. या वाड्याचे बांधकाम कधी झाले व इतर इतिहासकालीन काहीही संदर्भ मिळत नाहीत. वाड्याचे बांधकाम जांभ्या चिऱ्याचे, कमानीवर तोललेले, दुमजली असून मंगलोर कौलाचे छप्पर आहे. व्हरांड्याचे खांब व आतील तक्तपोशी लाकडी असून, रंगाने अतिशय सुबक नक्षीकाम केलेले आहे. राजापुरातील हा ऐतिहासिक ठेवा असून याचे रक्षण करणे फार गरजेचे आहे.