राजापूर शहर

राजापूर शहर :-
विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अशी अनेक गावे आहेत की जिथे निसर्गसौंदर्य, ज्ञान, कला, संस्कृती, धर्मकारण, राजकारण अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संगम आढळून येतो. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ‘राजापूर’ हे गांव म्हणजे ज्ञान, कला, संस्कृतीचा सुरेख संगम आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या गावातून येरडव, पाचल, कडून आलेली ‘अजुर्ना’ नदी व खरवते कोदवली कडून आलेली नदी यांच्या संगमावर वसलेलं राजापूर म्हणजे राजापूर व्हॅली आहे. कलात्मक मंदिरे, आकर्षक मशिदी, शिवकालीन, पेशवेकालीन वास्तू, जवाहर चौक व वरचीपेठ येथील पूल, विश्वनाथ विद्यालय, राजापूर हायस्कूलच्या कलात्मक जांभ्या दगडातील आकर्षक इमारती या सर्वांनी हे गाव सुशोभित आहे. कोकणी सौंदर्याच्या सुक्ष्मतम लेण्यांनी अलंकृत झालेले आपले राजापूर आहे.
राजापूर हे फार प्राचीन गाव आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून एक चांगलं बंदर व व्यापारी केंद्र म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध होतं. इंग्रजांच्या काळात ते व्यापारी केंद्र होतं. राजापूरी पंचे, राजापूरी खोबरे, राजापूरी हळद हे ब्रॅण्ड त्यामुळे प्रसिध्द आहेत. इंग्रजांची वखार राजापूरला होती ती जीर्ण झाल्याने पाडण्यात आली. राजापूर जवाहर चौक येथील दगडी पूल हा ३५० वर्षांपूर्वीचा आहे. आंबेवाडीतील नाईकीणीचा वाडा असलेली इमारतही फार जुनी आहे. भटाळी, गुजराळी येथे पेशवेकालीन स्थापत्य शैलीतील वाडे अजूनही अस्तित्व टिकवून आहेत. स्थापत्य वास्तुविशारद यांना प्राचीन कोकणी बांधकाम शैलीचा अभ्यास करण्यासाठी राजापूर हे चांगले शहर आहे. निसर्गचित्रकार, छायाचित्रकार यांना तर राजापूर म्हणजे नंदनवनच आहे. त्यांना त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याचे मोठे दालनच आहे.
इथली संस्कृती १५० वर्षापूर्वी किती प्रगत विचारांची, दूरदृष्टीची होती याची साक्ष देणारे, दीडशे वर्षाकडे वाटचाल करणारे नगर वाचनालय, १२५ वर्षे पूर्ण झालेले राजापूर हायस्कूल, दत्तात्रेयशास्त्रींनी स्थापन केलेली पाठशाळा व शतकाकडे झेप घेणारी लक्ष्मी केशव औषधशाळा या संस्था आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत, नव्या दमाने वाटचाल करीत आहेत.
मुबंई गोवा महामार्गावर एस्.टी. डेपोपासून १.५० कि.मी. अंतरावर इंग्रजांनी बांधलेला मोठा पूल आहे. पुलाच्या अलिकडेच डाव्या बाजूला सौंदळकडे रस्ता जातो तेथे पुलाला लागूनच पुरातन श्रीहनुमान मंदिराचे नूतन बांधकाम जांभ्या दगडाचा कौशल्यपूर्ण वापर करून, कमानी, कलाकुसर करून करण्यात आले आहे. समोरून वाहणारी अर्जुना नदी, त्यावरील ब्रिटीशकालीन पूल व काठावर असलेले लाल दगडातील मारूतीचे मंदिर व चारही बाजूला वृक्षांनी आच्छादलेले डोंगर यामुळे येथील निसर्गसौंदर्य बघण्यासारखे आहे.
पावसाळ्यात मात्र राजापूर बाजारपेठत पाणी भरते. वृक्षतोड, जमिनीचे मशिनने केलेले सपाटीकरण यामुळे राजापूरची नदी गाळाने भरली आहे. त्यामुळे १००-१२५ मि.मि. पाऊस झाला व त्याला भरतीची साथ असली की अर्धी बाजारपेठ पाण्याखाली जाते.
पावसाळ्यात आजुबाजूचे डोंगर हिरवेगार होतात. छोट्या नाल्यातून पाणी वहात असते. रानतळेवरून राजापूरचं दिसणारं निसर्गसौंदर्य विहंगम असते. शिवपूर्वकालीन निर्माण झालेल्या राजापूरात इतिहासाचा, निसर्गाचा, पर्यावरणाचा, जैवविविधतेचा अभ्यास, संशोधन करणार्यां ना बरंच काही बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल.
‘जशी दृष्टी तशी सृष्टी’असं राजापूर आहे. प्रत्येकालाच काहीतरी वेगळं वाटेल. त्यासाठी राजापूरला यायलाच हवं.