(भाग-१)
“कोकण रोजगार हक्क अभियान” अंतर्गत आझाद मैदानातील दि.२५/०६/२०१९ रोजी आयोजित केलेल्या “धरणे आंदोलन” कार्यक्रमाला कोकण वासीयांचा लाभलेला उत्स्फूर्त सहभाग, समयोचित नियोजन, सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी दिलेला व जाणवलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे हे अभियान यशाची पहिली पायरी गाठण्यात यशस्वी झाले असे माझे मत आहे.
कोकण विकासाचा विचार व प्रत्यक्ष कृती करताना राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला भाग पडणाऱ्या ह्या अभियानाची दखल इतिहास निश्चित घेईल. कोकणातील लोकांमध्ये विकासात्मक दृष्टीकोनातून ,संघटित प्रयत्न करून कोकण विकासासाठी प्रयत्न करणार हे रचनात्मक आंदोलन आहे.
यासाठी समृद्ध कोकणचे संस्थापक, अध्यक्ष मा. श्री. संजय यादवराव व त्यांना सहकार्य करणारे आपण सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो व सर्व सहभागी कोकणवासीयांचे आभार मानतो.
कोकणला काय पाहिजे हे सांगणाऱ्या रचनात्मक आंदोलनाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सर्व कोकणवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यायला पाहिजे व त्यासाठी भविष्यातील अभियानाची दिशा ठरवावी लागेल, त्यासाठी हा लेखनप्रपंच आहे…….
रोजगार हक्क अभियान आंदोलनाच्या तयारीसाठी तालुकावार लावलेल्या बैठका, त्याला मा. यादवराव यांची उपस्थिती व मार्गदर्शन खूप चांगले होते. मा.तहसीलदार, स्थानिक आमदार यांना निवेदन देणे, प्रत्येक जिल्ह्यात कोकण विकास यात्रा, रोजगार हक्क परिषद आयोजित करून,मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे.
सर्व कोकण वासियांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे पावसाळ्यात गांव ते मुंबई प्रवास करून कोकण वासीयांना या अभियानात सहभागी करणे हे (पावसाळयातील आपत्कालीन परिस्थिती कधीही येऊ शकते या शक्यतेवर) आव्हानात्मक असताना; सरकारच्या शेवटच्या अधिवेशनापूर्वी धरणे आंदोलन करणे महत्वाचे असल्याने हा निर्णय घेणे व अंमलबजावणी करणे हे धाडसाचे होते व ते धाडस पूर्ण केल्याबद्दल श्री. यादवराव व सर्व सहभागी कोकणवासीयांचे कौतुक केले पाहिजे, त्यांच्या इच्छाशक्तीला सलाम केला पाहिजे.
आंदोलनाच्या यशाचा आनंद साजरा केल्यानंतर त्याच्या आयोजनाचे सिहांवलोकन करणे आवश्यक आहे.त्यातील काही मुद्दे.
१) नियोजनाची सुरवातीची व अखेरची कार्यक्रम पत्रिका, त्याची वेळ ह्यामध्ये बदल होत होता. त्यामुळे यापुढे समन्वयातून एकच कार्यक्रम पत्रिका निश्चित करून शेवट पर्यंत एकच ठेवणे आवश्यक आहे.
२)”कोकण रोजगार हक्क अभियान” प्रत्येक कोकणी माणसापर्यंत पोहचविण्यासाठी व त्या भावना मा. मुख्यमंत्री यांच्या पर्यन्त पोहचविण्यासाठी आपण सह्यांची मोहीम यशस्वी पणे राबविली .या कोकणवासीयांच्या सह्यांच्या अपेक्षा पत्रांचे करायचे काय याबाबत भूमिका व कृती करायला आपण विसरलो.याबाबत मला असे सुचवायचे आहे की, हे निवेदन नवीन सरकार आल्यानंतर डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी२०२० यादरम्यान मा. मुख्यमंत्र्यांना ध्यावे.ह्या निवेदनाची सरकार दरबारात किती महत्व असेल किंवा किती जपून ठेवले जाईल हे माहीत नाही, परंतु आपल्या लेखी त्याचे मूल्य व महत्व खूप मोठे आहे, त्यामुळे प्रत्येक सह्यांच्या कागदाची झेरॉक्स करून त्याची एक प्रत आपल्याकडे कायम जतन करून ठेवली पाहिजे. कोकण विकास आंदोलनाचा हा दस्तऐवज फार महत्वाचा (यासाठी आम्ही अपार कष्ट घेतले आहेत)असल्याने प्रत्येक जिल्हानुसार त्याचे व्यवस्थित बायडिंग करून त्याला पुठ्ठा कव्हर घालून तो मा. मुख्यमंत्री यांना सादर केला पाहिजे व आपल्याकडे एक प्रत जपून ठेवली पाहिजे.
आझाद मैदानावर सर्व राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतावरून असे दिसून आले की सर्व विरोधक विधान भवनात कोकणासाठी आवाज उठवतात व सर्व सत्ताधारी कोकण विकासाची धोरणे ठरवून त्याला निधी उपलब्ध करून, योजना कार्यान्वित करतात.(यावर मी विडंबनात्मक लिहणार आहे)हे त्यांचे म्हणणे खरे असेल तर कोकणच्या विकासाकडे शासनाचा, राजकीय नेत्यांचा दुर्लक्ष होतोय हे म्हणणे लोकांच्यात जाऊन पुन्हा तपासून बघावे लागेल. आपण कोकणी माणसापर्यंत प्रत्यक्ष जाऊन कोकणी माणसाला काय पाहिजे?काय मिळाले?अपेक्षित मिळालं नसेल तर ते का मिळालं नाही याचा शोध घेऊन त्याचे दस्ताऐवजीकरण करून सरकारला त्याचा अहवाल पाठवावा लागेल व या राजकीय भाषणबाजीला वास्तवीकतेचा लगाम घालावा लागेल.
(भाग-२)
“कोकण रोजगार हक्क अभियान” ची मुहूर्तमेढ मा.श्री.संजयजी यादवराव यांनी केली त्याला पर्यटन व्यवसायिकांनी (मी पर्यटन व्यवसायिक नाही) झोकून पाठिंबा दिला; रत्नागिरी जिल्ह्यातील श्री.कौस्तुभ सावंत, श्री. सुहास ठाकुरदेसाई व त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य व योगदान या अभियानासाठी मोठे आहे.
कोकणातील पर्यटन व्यवसायात स्थानिक माणूस मोठ्या प्रमाणात आहे(स्थानिक असल्याने त्यांनी या अभियानाला झोकून पाठिंबा दिला) त्यांना कोकणभूमी ही रोजगार देणारी भूमी आहे हे लक्षात आले व त्यांनी कृतीने ते सिद्धही करून दाखविले. स्थानिक पर्यटन व्यवसायिक संघटित झाले, एकवटले व कोकणच्या विकासासाठी कार्यप्रवण झाले,त्यामुळे यशाची एक पायरी आपण चढू शकलो असे माझे मत आहे.
तसेच इतर(आंबा, काजू, मच्छिमारी) व्यवसाय हा स्थानिकांच्या हातात राहून त्यांना आर्थिक सक्षमता आली तर त्यांचे पाठबळ या अभियानाला मिळेल व यशाच्या अनेक पायऱ्या आपण चढू शकू, त्यासाठी स्थानिक माणसांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या जोरावर व्यवसाय, व्यापार करून आर्थिक व सामाजिक स्थिरावण्यासाठी आपण प्रचार, प्रसार व प्रबोधन करून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.(माझं काम याप्रकारातील आहे).प्रत्येक कोकणवासीयांमध्ये मी कोकणात राहून चांगले जीवन जगू शकतो ही भावना निर्माण करणे व कृतीत उतरायला मार्गदर्शन करणे हे आपले काम आहे.
“कोकण रोजगार हक्क अभियान”चे मुख्य उद्दिष्ट हे “कोकणातील तळागाळातील गरीब, होतकरू माणसाचे जीवनमान उंचावणे हे असले पाहिजे”.त्यासाठी ही चळवळ सर्वसामान्य कोकणी माणसापर्यंत पोहचविणे व त्याचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणे भावी काळात आवश्यक आहे.
आपण प्रमुख ज्या दहा मागण्या केल्या आहेत त्यातील तीन प्रमुख मागण्यावर सरकारला निर्णय घ्यायला व अंमलबजावणी करायला तातडीने भाग पाडले पाहिजे व इतर मागण्यावर अभ्यासपूर्ण पाठपुरावा करीत राहिले पाहिजे.
१) मा. श्री. भाई जगताप यांच्या मनोगतात ते स्थानिकांना रोजगार देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय झालेला आहे असे समजले. अकुशल कामगार भरतीत ८०% व कुशल कामगार भरतीत ७५% स्थानिक असले पाहिजेत अश्या आशयाचा निर्णय झाला आहे असे ते म्हणाले. त्याची सत्यता पडताळून स्थानिकांना ज्ञाय देण्यासाठी तातडीने प्रयत्न केला पाहिजे. कोकणात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत त्यांना कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता,कौशल्य लागते, कोणत्या इतर बाबी (MS-CIT, मराठी,इंग्रजी टायपिंग, जातीचे दाखले ई) लागतात त्यांचे व परीक्षेचे मार्गदर्शन आपण केले पाहिजे.(मुंबईत स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन करून असे काम शिवसेनेने काही वर्षांपूर्वी चांगले केलेले होते) असे काम लांजा तालुक्यातील श्री. रुपेश गागंण करत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. नोकऱ्यात स्थानिक तरुणांना संधी मिळाली तर नवीन तरुण वर्ग आपल्या अभियानाकडे आकर्षित होईल व अभियान कायमस्वरूपी कार्यप्रवण राहण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. आपले अभियान अजून तरुण वर्गात म्हणावे तसे पोहचले नाही किंवा त्यांचा पाठिंबा लाभला नाही त्यासाठी नोकऱ्यात स्थानिकांना प्राधान्य हा मुद्दा तात्काळ सोडविणे गरजेचे आहे.
२)कोकणाला स्वतंत्र विध्यापीठ व कोकणात रोजगार करायला अनुकूल व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करणे हा निर्णय सरकारला त्वरित घ्यायला भाग पाडले पाहिजे व त्वरित कार्यवाही करून विध्यापीठ सुरू झाले पाहिजे. अभियानाचे सकारात्मक रूप हे विध्यापीठाच्या रूपाने अवतरले तर ते कोकण विकासाचे चिरंतर स्मारक होईल. कोकणी माणसामध्ये शिक्षण घेण्याची आवड आहे त्यामुळे विध्यापीठ निर्मिती झाली की कोकणी तरुण त्याचा लाभ घेईल व आपल्या अभियानाची विश्वासहर्ता तरुण पिढीमध्ये वाढेल. यासाठी विध्यापीठ निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवा.
३) २०१९ पर्यतची सर्व पर्यटन बांधकामे अधिकृत करावी व पुढील परवानग्या जिल्हा पातळीवर मिळाव्यात ही तिसरी मागणी आपण लावून धरली पाहिजे. या चळवळीचा खरा आधार हा पर्यटक व्यवसायिक आहे व त्यात स्थानिक कोकणी माणूस आहे. २०१९ पर्यंतची पर्यटन बांधकामे अधिकृत करून आपण स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी संरक्षण दिले पाहिजे व नवीन बांधकामे कायद्याच्या चौकटीत करण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
या तीन मागण्यांवर आपण लक्ष केंद्रीत करून उरलेल्या मागण्यांसाठी तज्ज्ञांच्या सल्याने पाठपुरावा करीत राहिला पाहिजे.
शेवटची बाब म्हणजे VISION DOCUMENT तयार करणे. माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी तालुक्यात विविध विषयांवर काम करणारे माहितगार माणसे व तज्ञ माणसे आहेत, त्यामुळे रत्नागिरी तालुक्याचे VISION DOCUMENT तयार करून ते इतर तालुक्यांना मार्गदर्शक म्हणून देऊन प्रत्येक तालुक्यांनी तसे केले पाहिजे.
वरील विवेचन माझ्या रोजगार हक्क अभियानातील मर्यादित सहभाग,मर्यादित आकलन क्षमतेप्रमाणे केलेले आहे. रायगड, पालघर मधील माझा संपर्क नसल्याने मी त्यावर उल्लेखनीय भाष्य केले नाही.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर सह ठाणे, मुंबई भागातील सर्व कोकणवासीयांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन,संघटित, सातत्यपूर्ण, प्रयत्नांवर या अभियानाचे भविष्य अवलंबून आहे,
“कोकणी माणसा जागा हो,
कोकण विकासाचा धागा हो”.
ही घोषणा प्रत्यक्षात अवतारण्यासाठी प्रत्येक कोकणवासीयांना अभियानाचे महत्व समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढवून हे अभियान पुढे नेले पाहिजे असे मला वाटते.(समाप्त)
धन्यवाद
श्री. जगदीश पवार-ठोसर
माय राजापूर