शेतीची गाथा भाग 2

नमस्कार,
तिठवली,धोपेश्वर वस्ती……….
कोदवली पेट्रोल पंप जवळून राजापूर मुसाकाझी रस्त्याने पाच किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला वळले की दीड दोन कि. मी. वर तिठवली वाडी लागते, वाडी लगतच वहाळ आहे त्यावर लोखंडी साकव आहे तो ओलांडला की श्री भ्राडिन देवीचे मंदिर आहे त्याच्या वरच्या बाजूला प्रयोगशील शेतकरी राहतात त्यांचे नाव आहे श्री. शिवराम शंकर करंबेळकर.
आमचे मित्र श्री.चंद्रशेखर सिनकर राजापूरात प्रयोगशील शेतकरी कोण हे माहिती करून घेत असतात व “माय राजापूर” च्या वतीने आम्ही त्यांना भेटी देतो व त्यांची माहिती घेत असतो.
आज सायंकाळी आम्ही दोघे त्यांना भेटायला गेलो त्यावेळी ते व त्यांची पत्नी सौ. इंदुमती शेतातच काम करत होते. घराजवळ काही मळ्यात त्यांनी कलींगड लावले होते, त्याच्या वरील जागेत दीडशे फोपळी ,काही माड व त्याच्या वरील जागेत सत्तर वेंगुर्ला सात जातीचे काजू लावलेले. त्याच्या मध्ये वीस गावठी म्हशींचा गोठा आहे.ते प्रसिद्द आहेत ते काळीमिरीच्या शेतीसाठी, फोपळीच्या झाडावर त्यांनी काळीमिरीची झाडे लावावीत त्यावर वर्षाला ८०-१०० किलो काळीमिरी घेतात.
मध्यम उंची, मध्यम बांधा व गोरा वर्ण असलेले ६६ वर्षाचे करंबेळकर यांनी आमचे स्वागत हसत केले व वर वर्णन केलेले शेत फिरवून दाखविले.लहानपणी करंबेळकर यांची घरची खूपच गरिबी त्यामुळे सातवी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी हॉटेलात काम करायला सुरुवात केली, त्यानंतर रोजींमदारीवर काम केले,१९८० साली लग्न झाल्यावर त्यांची परिस्थिती अधिकच हालाकीची झाली, त्यात चार मुले व त्यांचे पालन पोषण करताना ओढाताण होयची पण त्यांनी धीर सोडला नाही, दुसऱ्याच्या बागेत काम करताना त्यांनी स्वतःच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली .कामावर जाण्यापूर्वी व कामावरून आल्यानंतर ते आपल्या शेतात काम करू लागले त्यांच्या बायकोनेही या कामात त्यांना खंबीर साथ दिली. ते म्हणतात माझी बायको माझ्यासाठी लक्ष्मी आहे, १९९४ साली त्यांनी दीडशे फोपळी व काही माड लावले, कुणबी बँकेच्या साहाय्याने त्यांनी म्हशी घेतल्या व त्यानंतर मोलमजुरी करण्याचे सोडून देऊन स्वतःच्या शेतीत पूर्ण लक्ष देऊ लागले, त्या उत्पन्नावर त्यांनी तीन मुलींची व्यवस्थित लग्ने करून दिली, व आत्ता आनंदात व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगत आहेत. त्यांचा दत्ताराम हा मुलगा त्यांना शेतीच्या कामात मदत करत असतो.
त्यांच्याशी बोलताना शेती करून तुम्हाला काय मिळाले ? असे विचारले तेव्हा ते म्हणाले की शेतीमुळे मला माझी ओळख मिळाली, आर्थिक उत्पन्न मिळाले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास व आनंद मिळाला.


आपल्या सारखे या वाडीत कोणी शेती करतात का? त्यावर वाडीतील लोके पावसाळ्यात शेती करतात पण वर्षभर वेगवेगळी शेती कोण करत नाही, त्यांना त्याची आवड नाही. येथील मुले साधारण शिकली की मुंबईला जातात व इथे राहणारे दुसऱ्यांकडे गडीकाम करतात. माझ्या बरोबरचे जे मुंबईला गेले त्यांच्या एवढे मीही मिळवले व त्यांच्यापेक्षा जास्त आनंद व चांगली तब्बेत मिळवली. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा उत्स्फूर्तपणा होता, आत्मविश्वास होता .
त्यानी सांगितले….
१)आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, प्रामाणिक पणाला कधीही मरण नाही.प्रामाणिक माणूस आपली प्रगती करतोच.
२)आपल्याकडील सामायिक शेती विभागून त्याचा सातबारा वेगळा करून घेतला पाहिजे म्हणजे माझ्या सारख्या मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. मी माझ्या इतर सामुहीक जमिनीचा हक्क सोडून या जागेची मागणी केली व लवकरच कोर्टा मार्फत त्याचा वेगळा सातबारा व नकाशा तयार होईल. जेणेकरून मला सरकारी योजना, अनुदान याचा फायदा घेता येईल.
३)शेतीला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. काळीमिरी, काजू याला दोन वर्षात कमी भाव मिळतोय. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज होण्यासाठी योग्य भाव सरकारने मिळवून ध्यावा, योग्य भाव मिळाला तर कर्जमाफीची प्रामाणिक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कधीच गरज लागणार नाही.
४)माझे शिक्षण सातवी असले तरी मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे मला शेतीतील ज्ञान मिळाले. प्रत्येकाने वाचन करून आपले ज्ञान वाढविले पाहिजे.
५)आपल्या शेतात काम करताना इतका आनंद मिळतो की काम हे काम वाटतच नाही.
६)भविष्यात कोकणी माणसाने कष्ट करण्याची तयारी ठेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग करत वेगवेगळी शेती केली पाहिजे.
७)झाडाची मेहनत केली तर झाड आपल्याला अपेक्षित फळ देतेच.
श्री. जगदीश बंडोपंत पवार-ठोसर
माय राजापूर.