शेतीची गाथा भाग 3

सिनकर साहेबांचा फोन आला,आज संध्याकाळी वेळ आहे का? आनंदवनात जायचे आहे. कुठलं आनंदवन……… जुवाठीतील श्री. बी. के. गोंडाळ सरांच्या आनंदवनात. मी वेळ आहे म्हटले व मी, हृषीकेश, समीर,सिनकरसाहेब व सोलकर सर सायंकाळी जुवाठीला जायला निघालो.

        राजापूर पासून हातीवले येथे जैतापूर रस्त्यावरून तीन की. मी. वर डाव्या हाताला जुवाठी पुजारे वाडीत सरांनी एकतीस गुंठे जागा घेतलीय त्यात काजू लावलेत व त्या जागेत शेळी पालन व कुक्कुटपालन सुरू केलंय व त्याला नाव दिलंय “आनंद वन”.गोंडाळ सर जुवाठी हायस्कुलला शिक्षक आहेत.शीळ गावचे असलेले सर काबाडकष्ट करून शिकले, गारगोटी मौनी विध्यापीठात त्यांचे पदवीचे शिक्षण झाले, प्रा. राजन गवस सारखे प्रतिभावान व समाजाशी नाळ जुळलेले लेखक त्यांना प्राद्यापक म्हणून लाभले . सर्जनशील व्यक्तिमत्व असलेले गोंडाळ सर चांगले लिखाण करतात, त्यांचे अक्षर फार सुरेख आहे, वाचनाची आवड आहे,सामाजिक कामाची आवड आहे, बाबा आमटे कुटुंबाचा फार प्रभाव सरांवर असल्याने शीळ गावातील सामाजिक सेवेचे भान असलेल्यांनी “सर्वोदय” प्रतिष्ठान स्थापन करून गावातील लोकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले .पण राजापूरकर कोकणी माणसात राजापूर दादरावर (जवाहर चौक) रोज जायचे फ्याड व मुंबईचे फ्याड यामुळे म्हणावे तसे यश मिळाले नाही, मिळत नाही ही वस्तुस्थिती स्वीकारून  आपल्या आईच्या नावाने प्रत्येक शाळेत वाचनसंस्कृती वाढावी म्हणून वाचनालय काढतात व मोकळा वेळ या आनंदवनात व्यतीत करतात व श्रम जीवनाचे महत्व कृतीतून दाखवून देतात. आज सर, वहिनी व दोन मुले आनंदवनातच वस्ती करणार होते. आनंदवनात देखरेख करण्यासाठी त्यांचा पुतण्या श्री. नामदेव कृष्णा गोंडाळ याची साथ लाभली आहे.तो तेथेच राहतो .

      आम्ही आनंदवनात गेलो तर सर काम करत होते. आम्ही कुकऱ्याने साद घातल्यावर ते लगेच आले व त्यांनी आम्हाला शेळीचा गोठा दाखवला,कोंबडी पालन शेड दाखविली त्यांची माहिती दिली, काजू झाडातून तर आम्ही फिरतच होतो. त्यांचा पुतण्या नामदेव त्यावेळी बकऱ्यांना जंगलात चरायला घेऊन गेला होता. काजूची झाडे चार वर्षाची आहेत,झाडांची वाढ चांगली आहे, पाने हिरवीगार आहेत. या शेतावर शेळी पालन व कोंबडी पालन सुरू करून एक वर्ष झालंय. सर्व परिसर फिरून झाल्यावर आम्ही त्यांनी बांधलेल्या शेतघरात माडीवर बसून मस्त चहापात घातलेला गरम वाफाळलेला चहा घेतला व प्रकल्पाबाबत चर्चा करू लागलो,थोड्या वेळाने नामदेव शेरडं घेऊन आला व आमच्यात सामील झाला.

     कोकणी पदवीधर तरुण शेती व स्वयंरोजगार करतो हे दुर्मिळ दृश्य असते पण आज ते आमच्यासमोर होते. उत्कंठतेणे मी त्याचे शिक्षण विचारले तर सातवीपर्यंत शिक्षण शिळात झाले, त्यानंतर सर ज्या जुवाठी हायस्कूलला आहेत तेथे दहावी झाला, नवजीवन मध्ये बारावी झाला व लांजा येथे शेतीचा दोन वर्षाचा डिप्लोमा झाला त्यानंतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंर्तगत 2012 ते 2017 पर्यंत BVG (भारत विकास ग्रुप ,श्री. पांडुरंग गायकवाड यांचा) ग्रुप  मार्फत कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता, त्याच वेळी त्याने पदवीचे शिक्षण बाहेरून पूर्ण केले. कोकणात पाणलोट क्षेत्राचे काम करताना घाटावरील निकष कोकणात उपयोगाचे नाहीत, कोकणात नाले, नद्यांना उतार जास्त असल्याने व जमीन निचऱ्याची असल्याने त्याचा अभ्यास करून वेगळे निकष पाणलोट क्षेत्रासाठी हवेत हे मत आवर्जून मांडतो.

     शेळी प्रकल्प व कोंबडी पालन हे व्यवसाय बाजारातील मागणी व मला असलेले ज्ञान व आवड यामुळे सुरू केले. शहरात जाऊन 12-15 हजारांची नोकरी करण्यापेक्षा आपण शेतीतून व या जोड धंद्यातून चांगले पैसे व समाधान मिळवू शकतो हे वाटल्यानेच आपण हे करतोय. सद्या एक वर्ष होतेय त्यामुळे आर्थिक फायदा तोट्याचे गणित निश्चित सांगू शकत नसलो तरी चांगला आर्थिक लाभ मिळेल याची खात्री आहे.शेळी व कोंबडी पालनात वेगवेळ्या जातींचे वैशिष्ट्य, त्यांचे लसीकरण व बाजारातील मागणी याचा अभ्यास करून मी निर्णय घेत असतो त्यामुळे मला चांगला आर्थिक लाभ होईल याची खात्री वाटते.

    कोकणातील माणसे तुझ्यासारखा शेती व पूरक उधोग करून गावात का राहत नाही? असे विचारल्यावर डोक्यातील मुंबईचे फ्याड…….. श्रमाच्या कामाची लाज व रोजगाराच्या संधी शोधायची नसलेली सवय ही मुख्य कारणे सांगितली. कोकणातील समाजाची रोजगाराची चुकीची कल्पना असल्याने त्याला कोकणात रोजगार दिसत नाही. मी मात्र हे मनापासून स्वीकारल्याने आनंदी आहे. सूर्य मावळतीला जाऊन बराच वेळ झाल्याने आम्ही श्री व सौ. गोंडाळ सर व नामदेवचे आभार मानून एक नवीन शाश्वत विकासाची ऊर्जा घेऊन राजापूरला परतलो.

श्री. जगदीश पवार-ठोसर. माय राजापूर