आर्यादुर्गा मंदिर

श्री आर्यादुर्गा मंदिर :-
राजापूर रानतळे मार्गे दसूर-साटवली मार्गावर अळवाची फांदी येथून डाव्या बाजूला गेल्यावर विस्तीर्ण जांभ्या कातळाचे पठार लागते. या पठारावरच आर्यादुर्गा मंदिर असून राजापूरपासून हे अंतर :२३ कि. मी. आहे.
भाविकांच्या मते हे स्थान पांडवकालीन असून कुमारिका देवीचे मूळस्थान कर्नाटकातील अंकोला येथे आहे. कर्नाटकातील ‘आर्य’ व्दापावर प्रथम प्रगट झाली म्हणून ‘आर्यादुर्गा’ असे नाव पडले.
मंदिराची रचना कोकणी पारंपारिक पध्दतीची असून संगमरवरी मूर्ती मुंबईच्या पुराणिक नामक गृहस्थानी सुमारे १०० वर्षांपूर्वी घडवून येथे स्थापन केली आहे. सुमारे ३ फूट उंचीची ही महिषासुरमर्दिनी रुपातील मूर्ती चतुर्भूज असून एका हातात त्रिशुळ, एका हातात तलवार, एका हातात ढाल असून एका हाताने महिषासुराचे मस्तक पकडलेले आहे.
श्रावण महिन्यात जांभ्या कातळाच्या पठारावर विविध रानफुले उगवतात व या परिसराचे रूप खूप खुलते. वनस्पती अभ्यासकांना या काळात विविध रानफुलांचा अभ्यास करता येईल. श्रावण, भाद्रपद महिन्यात या मंदिराला अवश्य भेट द्यावी.