काजिर्डा धबधबा

काजिर्डा धबधबा :-
राजापूर तालुक्यातील काजिर्डा हे गाव कोल्हापूरला लागून आहे. राजापूरहून मुंबईकडे जाताना १३ कि.मी. वर उजव्या बाजूला पाचल रस्ता लागतो. तेथून २१ कि.मी. वर पाचल गावातून उजव्या बाजूला जवळेथर रस्ता असून ६.००. कि.मी. वर मुरांबा येथून डाव्या बाजूला रस्ता जातो. तेथून ७.०० कि.मी. वर काजिर्डा गाव आहे. सध्या तेथे धरणाचा प्रकल्प सुरू आहे.
धबधब्याचे पाणी सह्याद्रीच्या पर्वतावरून पडत असल्याने धबधब्यापर्यंत पोहचणे हे गिर्यारोहणाची आवड व तयारी असलेल्या पर्यटकांचे काम आहे. सर्वसाधारण, हौशी पर्यटक मात्र उंच हिरवेगार आच्छादन असलेल्या पर्वतरांगावरून धबधब्याचा आस्वाद घेऊ शकतात.
रस्ते वळणावळणाचे, दरी खोर्‍यातून व खराब असल्याने साहसी, धाडसी पर्यटकांनीच या बाजूला वळावे. मिनी लडाख ट्रीप केल्याचे समाधान मात्र मिळेल.
निसर्ग सौंदर्य इतकं अफलातून आहे की दिवस कधी जातो तेच कळत नाही. तेथे जाताना पावसाळ्यात गेलं पाहिजे व खाण्याचे पुरेसे पदार्थ आपण जवळ ठेवले पाहिजेत.
धाडसी, सौंदर्यासक्त पर्यटकांना याची भूरळ नक्की पडेल असा हा कोकणचा स्वर्ग आहे.