काल दि.१९/०३/१९ रोजी राजापूर तालुक्यातील कोतापूर गावचे प्रयोगशील शेतकरी श्री. चंद्रकांत जानस्कर,पत्नी उज्वला व त्याचा मुलगा श्री. गणेश जानस्कर यांची त्यांच्या घरी भेट घेतली व ते करत असलेल्या शेतीतील प्रयोगाबाबत माहिती घेतली. जानस्कर कुटूंबियांची उपजीविका ही शेतीवर चालते, वयाच्या बाविसव्या वर्षाला वडील वारले व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली.शेतीत अनेक हिस्सेदार असल्याने वाट्याला आलेली शेती तुकड्या तुकड्यात होती त्यातून येणाऱ्या उत्पन्नातुन कुटुंबाचे भागत नसे म्हणून त्यांनी वेगवेगळी शेती करायला सुरुवात केली व किराणा मालाचे छोटे दुकानही सुरू केले.
कोकणात नगदी उत्पन्न देणारी हापूस झाडे (६०),नारळ (२५),सुपारी(३५०)झाडे आपल्या वाट्याला आलेल्या उपलब्ध जागेत लावली व हळद, कोबी, मका, शेंगदाणा, कांदा, ओली मिरची, कुळीथ सेंद्रिय पद्धतीने करून त्यापासून आलेले उत्पादन आजूबाजूच्या पंचक्रोशीतील विकून आर्थिक प्राप्ती केली. बागायत व भाजीपाला यांना शेणखत, जीवामृत ,गोमूत्र या सेंद्रिय खतांचा वापर केल्याने फळांना व भाजीपाला याला चांगली गोडी व चव येत असल्याने लोक आत्ता त्यांच्याकडून उत्पादने खरेदी करण्यासाठी थांबतात. जागा व पाणी यांची उपलब्धता मर्यादित असल्याने त्यांना मोठया प्रमाणात उत्पादन घेता येत नाही ही जाणीव त्यांना बोचते. कुठलंही शेती विषयक शिक्षण नसल्याने शेतीचे वेगळे प्रयोग करताना त्यांना श्री. चंद्रकांत गुरव(शेती सहाय्यक),श्री. राहुल ठाकूर, रत्नागिरी,व श्री. अनिल नवलकर, कळे, कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हे ते आवर्जून सांगतात. शेतीच्या कामात बायकोची साथ भक्कम मिळाली, ती लक्ष्मी सारखी असल्याने मी आज यास्थितित (समाधानाच्या)आहे हे आवर्जून सांगतात. तसेच दोन्ही मुलेही शेती आवडीने करतात, त्यात लहान गणेश हा BSC Agri. झाला व शेती आधुनिक करायला मदत झाली हेही सांगतात. शेती करताना भटकी जनावरे, माकडे,वानर ,डुक्करे यांचा त्रास होतो नुकसान होते,त्यावर राखण करण्यासाठी दोन कुत्रे पाळले आहेत, ते भुंकून आम्हाला सतर्क करतात व आम्ही त्यांना हाकवतो त्यामुळे जास्तीचे उत्पन्न हातात लागते. आपल्या जमनित कोणतंही पीक होण्याची ताकद आहे फक्त कष्ट केले पाहिजेत, शेतीकडे आत्मीयतेने बघितले पाहिजे. आत्मीयतेने शेती केली तर मुंबईत राहून जे पैसे मिळणार नाही तेवढे पैसे येथे मिळतील व शेती करताना जे समाधान मिळते ते काही वेगळेच आहे.
आपण शेती करून चार पैसे मिळवता मग गावात तुमचे बघून किती शेतकरी प्रयोगशील शेती करतात असे विचारले त्यावर ते खिन्न होऊन म्हणाले आपली माणसे आळशी आहेत, शेतात कष्ट करणे कमीपणाचे वाटते त्यामुळे अश्या प्रकारची शेती विशेष कोणी करत नाही. कोकणाला निसर्गाने जे दिलेय त्याला कष्टाची जोड दिली तर प्रत्येक स्थानिक शेतकऱ्यांना चांगली आर्थिक प्राप्ती होईल पण आपले शेतकरी शेतीत प्रयोग व कष्ट करत नाही म्हणून आपण आर्थिक मागास आहोत.
त्यांचा मुलगा रत्नागिरीला गेला होता तेवढ्यात तो आला व आमच्याशी गप्पा मारण्यासाठी बसला, त्याला त्याच्या भविष्यकालीन योजनेबाबत विचारले असता मला कोतापूरात चांगले कृषी पर्यटन केंद उभारून येथेच राहायचे आहे व सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती करून प्रगतशील शेतकरी होणे आवडेल असे म्हणाला.
“राजापूरात हाय काय?”असे म्हणत नोकरीच्या मागे आयुष्य घालविणाऱ्या व हातावर हात घेऊन कोणी तरी (सरकार,उद्योग)येईल व आपल्याला काहीतरी देईल या आशेवर जगण्यापेक्षा जानस्कर कुटुंबाकडे बघत आपल्या जमिनीतून कष्ट करून आपल्याच जीवनाचे शिल्पकार बनावे म्हणून अश्या माणसांचा परिचय”माय राजापूर”संस्था करून देतेय.
आपणही असे प्रयत्न करा व आर्थिक सक्षम होताना समाधानी व्हा!
जानस्कर यांच्या मते…
१)आपली जमीन सोने आहे, कष्ट केले तर इथे काहीही पिकू शकते.
२)आळस झटका व कामाला लागा.
३)शेतीत काम करून उत्पादन घेऊन पैसे तर मिळतातच पण जे समाधान मिळते ते काही वेगळेच आहे.
४)कायम नामस्मरण करा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळत राहते, गंभीर संकटे टळतात हा माझा अनुभव आहे.
५)शेतीची आवड कुटुंबात निर्माण करा, कुटूंबात कायम एकोपा,उत्साह व ताजेपणा राहतो.
जानस्कर कुटुंबाची उत्साहपूर्ण भेट घेऊन मी, श्री. चंद्रशेखर सिनकर,श्री. हृषीकेश कोळेकर यांनी त्यांचे आभार मानून निरोप घेतला.
श्री. जगदीश बंडोपंत पवार-ठोसर.