गंगातिर्थ :-
‘गंगा’ ही तर राजापूरची ओळख आहे. ‘राजापूरची गंगा आली’ म्हणजे राजापूर उन्हाळे मध्ये असलेल्या काही नैसर्गिक झर्यातून अचानक पाणी वाहू लागत आणि एरवी कोरडी असलेली चौदा कुंड पाण्यानं भरतात. या झर्यातून सतत पाणी बाहेर येत असतं. हा प्रवाहच गंगा म्हृणून ओळखला जातो. तो रात्रंदिवस अखंड वहात असतो. एरवी गंगा जागृत नसताना या कुंडामध्ये पाण्याचा लवलेशही नसतो. बर्याच वेळा ज्यावेळी पाणी टंचाई असते अशा मार्च ते मे महिन्यात गंगा जागृत होते.
सभोवार जांभ्या दगडाची तटबंदी आहे. त्यामध्ये गंगेची कुंडे आहेत. प्रवेशद्वारासमोर काशीकुंड आणि गोमुख आहे. वटवृक्षाखाली ‘मुळ गंगा’ कुंड आहे. या मूळ कुडांतून गंगेचे प्रथम आगमन होते व त्यानंतर काशीकुंडाचा प्रवाह सुरू होतो. व नंतर इतर कुंडे भरतात. येथील प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. हे या पाण्याचे वैशिष्ट्य आहे.
राजापूर एस्. टी. डेपोपासून मुंबई गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने ३.०० कि. मी. अंतरावर डावीकडे ‘गंगातिर्थ’ असा बोर्ड आहे तेथून १.०० कि. मी. अंतरावर हे धार्मिक स्थळ आहे.
तसेच मुबंई गोवा महामार्गावर वरचीपेठ मोठ्या पुलानंतर डाव्या बाजूला रेल्वे स्टेशन रोड वरूनही गंगातिर्थाकडे जाता येते. या रस्त्यावर २.०० कि.मी. वर उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे बारमाही वाहत असतात. स्त्रिया व पुरूषांना स्नानाची स्वतंत्र व्यवस्था आहे. पाणी वहाते असल्याने आंघोळ करताना नैसर्गिक आनंद मिळतो.