राजापूरची खाद्य संस्कृती :-
राजापूर परिसरात उत्पादीत होणाऱ्या कृषी व सागरी उत्पादनांचा वापर करूनच स्थानिक लोक न्याहरी व भोजनाचे पदार्थ करतात.
ग्रामीण भागात सकाळी गावठी तांदळाची पेज, खिमट, लोणचे हे पदार्थ असतात तर शाकाहारी जेवणात तांदळाची भाकरी, चपाती, भात, भाजी, आमटी व लोणचे असे पदार्थ असतात.
घरी पाहुणे आले किंवा सणासुदीला सकाळी आंबोळी, घावणे हे पदार्थ करतात व दुपारी पुरणपोळी, उकडीचे मोदक, अळूवडी, श्रीखंड असे पदार्थ केले जातात.
मत्स्याहारी जेवण हे राजापूरकारांचे खास आवडीचे जेवण असते त्यात पापलेट, सुरमई, सरंगा, सौंदळा व बांगडा यांचे तव्यावर फ्राय करून खातात व त्याच माश्याचे उरलेले तुकडे टाकून सार केले जाते. भात व माश्याचे कालवण हे कमी वेळात होणारे स्वादिष्ट भोजन असते. समुद्रावर मिळणारे मासे, कोळंबी, खेकडे, तिसरे मुळे, कालव यांच्याही स्वादिष्ट रेसिपीज लोक करत असतात. पावसाळ्यात ताजे मासे मिळत नाही तेव्हा खारवलेले मासे ज्याला “सुकट “म्हणतात ते विस्तवावर भाजून भातासोबत खातात. सुक्या गोलीमाच्या वेगवेगळ्या भाजीतही वापर करून पदार्थ बनविला जातो.
राजापुरात कुंभार मळ्यातील वेगवेगळी पालेभाजी खूप चवदार असते. गोवळ गावातील वांगी, खाडीकिनारी होणारे कुळीथ व त्याचे पीठ हेही खूप विकले जाते. कुळीथ पिठले व भात हे इथले फास्टफूड आहे.
मांसहारी जेवणात गावठी कोंबडीचे मटण व खुसखुशीत वडे हा रविवार व तिखट सणाचा खास बेत असतो.
इथल्या हॉटेलमध्ये नाष्ट्याला कट मारलेली उसळ पाव, तिखट व गरम गरम मिसळ, खुसखुशीत कांदा भजी, बटाटा वडा व वडापाव हेच पदार्थ जास्त खाल्ले जातात.
ऋतू प्रमाणे येथील खाद्य संस्कृती बदलत असते.
पावसाळ्यात पडवळ, दोडका, भेंडी, वाल, यांची भाजी भरपूर करतात तर कारले, टाकळा, करडू या रानभाज्याही औषधी म्हणून केल्या जातात.
मार्च ते मे या महिन्यात ओल्या काजुगरांची उसळ, फणसाच्या गऱ्याची भाजी, ताज्या कैरीचे लोणचे, चटणी ह्या पदार्थांची स्थानिकांच्या जेवणात रेलचेल असते. हापूस आंबे, काजुगार, तळलेले गरे, फणसाची/आंब्याची पोळी(साठे), कोकम सरबत, आवळा सरबत हे पदार्थ विक्रीसाठी त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.