ना नफा ना तोटा तत्त्वावर (काही अंशी पदरमोड करून )दिपावली साहीत्य माय राजापूर कडून वितरण

अविष्कार मधुन आज दिव्यांग मुलांनी बनवलेले दिपावली साहित्य आले.मी आज सकाळी कोळेकर सरांना सांगितले की जर 29तारखेपूर्वी एखादे दिपावली किट आले तर माय राजापूरच्या ग्राहकांना दाखवता येतील.
आज 4 वा.सर्व साहित्य कोळेकर सरांनी रू.10338/- किमतीचे मला आणून दिले.
गेली 3 वर्षे ते मला अविष्कारकडून साहित्य आणुन देत आहेत.ग्राहकांनी पैसे दिल्यावरच मी त्यांना पैसे देतो.ट्रान्सपोर्टचे पैसे देखिल बऱ्याचदा ते देतात आजही त्यांनीच दिले.
माझ्या दुकानात साहित्य डिस्प्ले करणे बॉक्स आणून देणे ही कामे ते स्वत: करत.
त्यांच्या अश्या सहकार्यामुळेच मी हे साहित्य ग्राहकांपर्यंत वेळेत पोहचवु शकलो.प्रदीप कोळेकर सरांच्या सहकार्याबद्दल आभार.
केदार साने.

जेव्हा गवताला भाले फुटतात..!

जेव्हा गवताला भाले फुटतात !

माय राजापूर संस्थे मार्फत अनेक कारणाने पिडीत असलेल्या व्यक्ती / कुटुंबांना आपण यथाशक्ती मदत करत असतो.

हि मदत करताना आपण त्यांचा आत्मसन्मान जपला जाईल याची काळजी घेत त्या व्यक्ती कश्या आत्मनिर्भर होतील. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन ते आपल्या पुढील आयुष्यात कसे स्वयंपूर्ण होतील यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करतो.

कोविड मधे पितृछत्र हरपलेल्या बालकांना व त्यांच्या मातेला आर्थिक व जीवनावश्यक वस्तूची मदत करताना संस्था अध्यक्ष जगदीश पवार , ॠषीकेष कोळेकर , नरेश जसवंत , भोसले मॅडम , पंडीत मॅडम , प्रकाश परवडी , दत्तप्रसाद सिनकर व मी प्रत्येक कुटुंबियांची थेट भेट घेऊन हेच सांगत होतो की , ही मदत फार तुटपुंजी आहे.या मदतीचा उद्देश तुम्हाला या प्रसंगात धीर देणे आहे.पुढील आयुष्यात आपण स्वयंपूर्ण व्हावेत म्हणून प्रत्येकाने आपल्या जबाबदारी नुसार आचरण ठेऊन मेहनतीला प्रार्थमिकता देत या प्रसंगातून बाहेर पडायचे आहे.

इतर पिडीत लाभार्थी मधे देखील ही स्वयंपूर्णतेची ऊर्मी आपण प्रचार , प्रसार , प्रबोधन या त्रीसुत्रीच्या माध्यमातून करत असतोच.हे काम माय राजापूरचे सर्व सदस्य आप आपल्या परिने नेहमीच करतात. आपल्या न्याय हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा.. हे प्रबोधन मायराजापूर संस्था नेहमीच करत असते.

याचीच प्रचिती मला गोविंद काळे भेटले तेव्हा आली. काल जेंव्हा ते स्टुडिओत पेन्शनची कागदपत्रे घेऊन आले तेव्हा मी त्यांना विचारले तुम्हाला आता रेशन दुकानावर धान्य मिळायला लागले ना ! गोविंद काळे म्हणाले हो बरेच महीने रेशन मिळत नाही म्हटल्यावर मी एक दिवस रेशन कार्ड घेऊन साहेबाकडे गेलो त्याना सांगितले की माझी दोन मुले ×× आहेत. मी म्हातारा झालो .मला रेशनवर धान्य देत नाहीत. आम्ही जगू कसे… साहेबाने लगेच समोरच्या बाईला रेशन दुकानावर फोन लावायला सांगीतला.फोनवर आजच्या आज गोविंद काळे येतात त्यांना धान्य देणे अशी रेशन दुकानदारास समज दिली. मग मी रेशन दुकानात गेलो तसे मला गणपती सणा अगोदर पासूनच रेशन मिळू लागले.

त्यांनी कथन केलेला हा माय राजापूरसाठी विलक्षण अनुभव होता.

आज एक अशिक्षीत व्यक्ती आपला न्याय हक्क शासन दरबारी जाऊन मिळवू शकली. सरकारी अधिकारी यांना जाब विचारण्याचा आत्मविश्वास माय राजापूर ने एका अशिक्षीत
माणसामधे जागवला.ही बाब नोंद घेण्यासारखी..माय राजापूर ची ध्येये / उदीष्टे सफल होण्याच्या दृष्टीने पडलेले हे पाऊल पुढील वाटचालीसाठी माय राजापूर च्या सर्व सदस्यांन मधे उर्जा निर्माण करणारे आहे.हे शुभसंकेत आहेत.

मी गोविंद काळे यांच्याकडून पेन्शनची कागदपत्रे घेतली.त्याना सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली .तसे गोविंद काळे उठले मला दोन्ही हात जोडत… तुमचे (माय राजापूर ) आशिर्वाद असेच माझ्या लेकरांवर राहून देत असे म्हणत स्टुडिओतून बाहेर पडले. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पहात मनाशी विचार केला .या सामन्यातील असामान्य ताकदीला माय राजापूर संस्थेने ज्वलंत करायला हवं. प्रत्येकामधील शक्ती आहे त्याचा वापर त्याला कसा करायचा याचे मार्गदर्शन करायचे . माय राजापूर ने त्यांच्यात हा आत्मविश्वास जागवायचाय…. मग गवतालाही भाले फुटतील !
धन्यवाद !
@ प्रदीप कोळेकर , माय राजापूर

संकेतस्थळ अनावरण सोहळा- 5 मे 2018

माय राजापूरच्या www.myrajapur.in या संकेतस्थळाचा अनावरण सोहळा राजापूर हायस्कुलच्या कलामंदिर सभागृहात पार पडला या कार्यक्रमाची माध्यमांनी घेतलेली दखल.

image

image

image

image